जगभर थैमान घालणाऱ्या कोरोनाचा महाराष्ट्रात वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आयआयटी मुंबईमधील सर्व विद्यार्थ्यांना ७२ तासांत म्हणजेच शुक्रवार, २० मार्चपर्यंत वसतिगृहे खाली करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मंगळवारी संस्थेच्या सर्व विभागप्रमुख आणि प्रशासकीय प्रमुखांची तातडीची बैठक घेऊन येणाऱ्या ७२ तासांत आयआयटीमधील येण्या-जाण्यावर कडक निर्बंध लादण्याचा, वसतिगृहे खाली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संस्थेचे संचालक सुभाषिश चौधरी यांच्याकडून हे आदेश काढण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या सूचनांनुसार आयआयटी मुंबईमधील सर्व लेक्चर्स, सेंट्रल लायब्ररी सारख्या सुविधा आणि प्रयोगशाळा आधीच बंद करण्यात आल्या आहेत.
ज्या विद्यार्थ्याना वैद्यकीय कारणामुळे किंवा जे विद्यार्थी परदेशात राहतात आणि आपल्या मूळ गावी जाऊ शकत नाहीत त्यांना संबंधित डीनची परवानगी वास्तव्यसाठी घेणे बंधनकारक असणार आहे. येणाऱ्या काळात संस्थेतील खानावळ बंद करण्यात येणार आहेत. विशेष परवानगी घेतल्यास विद्यार्थ्यांना मर्यादित व्यवस्था करता येणे शक्य असल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
जर कालावधीत वाढ किंवा फरक करण्यात आला तर पुढील सूचना ई मेल द्वारे विद्यार्थ्यांना कळविण्यात येणार असल्याचे सुद्धा या पत्रकात म्हटले आहे. बाहेरील व्यक्तींना या परिसरात भेटण्यासाठी जाण्यास बंदी करण्यात आली आहे.
संकुलातील सेंट्रल लायब्ररी बंद राहणार असून संशोधनाचे कार्यही तात्काळ थांबविण्याचे निर्देश
राज्य सरकारने राज्यातील शाळा महाविद्यालयाना सुट्टी जाहीर केल्यानंतर आयआयटीमध्ये २४ तास सुरू असलेली सेंट्रल लायब्ररीतील रिडींग रूम २९ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयआयटीने प्रतिबंधात्मक खबरदारी म्हणून २९ मार्चपर्यंत सर्व विभागाचे वर्ग तसेच प्रयोगशाळा बंद ठेवण्यात निर्णय घेतला आहे. यासंदर्भात सर्व विद्यार्थ्यांना ई मेलद्वारे वर्ग तसेच प्रयोगशाळा बंद ठेवणार असल्याचे कळवण्यात आले आहे. तसेच विद्यार्थ्यांना घरी जायचे असल्यास त्यासंबंधी परवानगीही देण्यात आली आहे.
पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या आपले थेसिस, प्रोजेक्ट आयआयटीमध्ये राहून आपलं काम पूर्ण करण्याचा सूचना दिल्या गेल्या आहेत. मात्र, हे काम करताना योग्य ती खबरदारी घेण्याचे सांगितले आहे.
आयआयटी कॅम्पसमध्ये काम करणाऱ्या सेक्युरिटी गार्डस कर्मचारी वर्गाला सुद्धा खबरदारी म्हणून मास्क आणि हँड ग्लोव्हज घालण्यास सांगण्यात आले आहे.
No comments yet.