पाठीमागील काही वर्षात रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांवरील हल्ल्यांमध्ये वाढ झाली असून, हॉस्पिटलच्या तोडफोडीच्या घटनाही तितक्याच प्रमाणात वाढल्या आहेत. नुकत्याच साजऱ्या झालेल्या ‘डॉक्टर्स डे’च्या निमित्ताने इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे डॉक्टरांवरील हल्ले या विषयावर वोक्खार्ट हॉस्पिटलमध्ये एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉक्टरांवर हल्ले हे भ्याडपणाचे लक्षण असल्याची भुमिका या चर्चासत्रातील तज्ज्ञांनी मांडली. यावर सर्व डॉक्टरांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे आवाहन सुद्धा इंडियन मेडिकल असोसिएशनच्या मीरा भायंदर शाखेतर्फे करण्यात आले.
यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशन संघटने डॉक्टर्सवर, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी कायदा व सुरक्षावर, माजी महापौर गीता जैन यांनी राजकीय पक्षांच्या भूमिकेवर, तर जेष्ठ पत्रकार राम खांदारे यांनी प्रसार माध्यमांच्या जबाबदाऱ्यांवर आपली मते मांडली.
अनेकवेळा गैरसमजुतीतून वाद निर्माण होतात. वादाची ठिणगी पडताच काही समाज विघातक मंडळी याचा बाऊ करून हॉस्पिटलची तोडफोड करत डॉक्टरांना मारहाण करतात. डॉक्टरांवरील हल्ल्यांमुळे संपूर्ण हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांचे मनोबलच खचून जाते. यासाठी सर्व डॉक्टरांनी एकत्र येणे फार गरजेचे आहे, असे मत इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्र सचिव डॉक्टर पार्थीव संघवी यांनी येथे व्यक्त केले.
कॉर्पोरेट हॉस्पिटल म्हणजेच अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त असलेल्या हॉस्पिटलवर हल्ले का होतात याची कारणे व हे हल्ले कसे टाळता येतील यावर वोक्खार्ट हॉस्पिटलचे केंद्र प्रमुख रवी हिरवानी यांनी उपयुक्त मार्गदर्शन केले.
रुग्ण व डॉक्टर तसेच रुग्णाचे नातेवाईक व डॉक्टर यांच्यामध्ये आत्मियतेचे नाते निर्माण केल्यास डॉक्टर आणि रुग्णालयांवरील हल्ले टाळता येऊ शकतील असा ठाम विश्वास जेष्ठ पत्रकार राम खांदारे यांनी व्यक्त केला. तर पोलीस, महानगरपालिकेचा आरोग्य विभाग, आपत्कालीन सेवा व खासगी तसेच सरकारी हॉस्पिटल यांनी एकत्र येऊन या विषयावर जनतेमध्ये जनजागृती केली पाहिजे असे यावेळी बोलताना गीता जैन सांगितले.
कायद्या विषयी बोलताना कायदा सर्वाना समान असून, समुपदेशनातून हल्ले टाळता येऊ शकतील असे विचार यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी मांडले.
No comments yet.