पवई पोलीस ठाण्याचे (Powai police station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक (वपोनि) (Senior Police Inspector) बुधन सावंत ३० ऑगस्टला सेवानिवृत्त (retired) झाले असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सिताराम सोनावणे (Sr. PI Jitendra Sonavane) यांनी पदभार स्वीकारला आहे. महाराष्ट्रभर विविध पदांवर काम करणाऱ्या सोनावणे यांनी अकोला किडनी रॅकेट गुन्ह्याच्या तपासाचे नेतृत्व केले होते. गुरुवार, १४ सप्टेंबरला त्यांनी पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून पदभार स्वीकारला.
यापूर्वी सोनावणे हे नवीमुंबई येथील तळोजा पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. यापूर्वी पवईच्या आसपासच्या परिसरातील पोलीस ठाण्यात कार्यरत असल्याने त्यांना परिसराची चांगली माहिती आहे. शांत स्वभावाचे अनुभवी अधिकारी या परिसराला लाभल्याने पोलीस कर्मचाऱ्यांचा कामाचा हुरूप वाढला आहे.
सोनावणे हे १९९६ बॅचचे अधिकारी असून, त्यांनी यापूर्वी मुंबई, नवी मुंबईसह महाराष्ट्रातील विविध भागात काम केले आहे. शहरी आणि ग्रामीण भागात पोलीस उपनिरीक्षक (police sub-inspector) ते पोलीस निरीक्षक (police inspector) अशा विविध पदांवर काम करत मिळालेला दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. मुंबईतील व्यस्त आणि अतिसंवेदनशील भागातील पोलीस ठाणे, गुन्हे शाखा (Crime Branch) सारख्या शाखांमध्ये त्यांनी काम केले आहे.
त्यांच्या या संपूर्ण पोलीस कर्तव्याच्या काळात २०१५ साली अकोला स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असताना येथील किचकट किडनी रॅकेटच्या गुन्ह्याची उकल करून आरोपींना कडक शिक्षा मिळवून देण्यात त्यांनी नेतृत्व केले आहे. श्रीलंका कनेक्शन असलेल्या या गुन्ह्याचे धागेदोरे राज्यासह परदेशात होते. आंतरराष्ट्रीय स्तरावरील किडनी विक्रीच्या रॅकेटच्या या गुन्ह्याच्या तपासाने त्यांना एक नवीन ओळख मिळवून दिली आहे.
पवई पोलीस ठाण्याच्या अखत्यारीत येणारा परिसर हा तसा शांत असला तरी, बाजूला असलेल्या आयआयटी मुंबई (IIT Mumbai) सारख्या संवेदनशील ठिकाणावर त्यांना विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. उच्चभ्रू वसाहत आणि चाळसदृश्य वस्त्या अशा दोन्ही भागाचा समावेश असणारा असा पवई परिसर आहे, त्यामुळे याचा समतोल साधत काम करावे लागणार आहे.
२६ वर्षाच्या आपल्या कार्यकाळात रोज नवनवीन केसेस हाताळल्या आहेत. एकदम साधी वाटणारी केस सुद्धा खूप मोठी असते, त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक प्रकरणाला व्यवस्थित हाताळण्यावर त्यांचे लक्ष असणार असल्याचा विश्वास त्यांनी आवर्तन पवईशी बोलताना वर्तवला.
वपोनि सोनावणे यांनी पदभार स्विकारल्यानंतर पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी कर्मचारी यांच्याशी संवाद साधत परिसरातील विविध समस्या आणि वाटचालीवर चर्चा केली.
No comments yet.