पवईत तोतया पोलीस अधिकाऱ्याला गांजा पिताना अटक

पवई परिसरात पवई पोलिसांचे दहशतवाद विरोधी सेल (एटीएस) पथक गस्त घालत असताना पथकाने एका व्यक्तीला ताब्यात घेवून झडती घेतली असता त्याच्याकडे पोलीस उपनिरीक्षकाचे बनावट ओळखपत्र पोलिसांना मिळून आले आहे. यासंदर्भात पवई पोलिसांनी गुन्हा नोंद करत आरोपी अभय रामचंद्र पेडणेकर (४१) याला ताब्यात घेतले आहे.

या संदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवई पोलिसांचे एटीएस पथक हे पवईतील विविध भागात गस्त घालत असताना मोरारजी नगर भागात एक इसम गांजा पिताना आढळून आला. पोलीस पथकाने त्याला ताब्यात घेवून चौकशी केली असता त्याने आपले नाव अभय असे सांगतानाच तो सांताक्रूझ येथील रहिवाशी असल्याचे सांगितले.

“पथक त्याच्याकडे अजून काही नशेचे पदार्थ आहेत का? याबाबत झडती घेत असताना त्यांना त्याच्याकडे पोलीस उपनिरीक्षकाचे बनावट ओळखपत्र मिळून आले,” असे पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनावणे यांनी सांगितले.

“आरोपीकडे अजून चौकशी सुरु असून, प्राथमिक तपासात त्याने हे ओळखपत्र टोल नाक्यांवर दाखवून टोल वाचवण्यासाठी बनवले असल्याचे समोर येत आहे,” असे दहशतवाद विरोधी सेल अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुर्यकांत पारटकर यांनी सांगितले.

पवई पोलीस भादवि कलम १७१, सह ८ (क), २७ एनडीपीएस कायद्यान्तर्गत गुन्हा नोंद करून त्याच्या विरोधात आणखी काही गुन्ह्यांची नोंद इतर कोणत्या पोलीस ठाण्यात आहे का? याबाबत माहिती मिळवत अधिक तपास करत आहेत.

सपोनि पारटकर, पो. ह. जगधने, पोना लांडगे, पोशि कसारे यांनी ही कारवाई केली.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!