अविनाश हजारे
पवई तलावाचे होणारे गटार रोखण्यासाठी आवर्तन पवई, पॉज मुंबई आणि पवईकर यांनी हाती घेतलेल्या पवई तलाव मोहिमेला उदंड प्रतिसाद मिळत आहे. याचाच एक भाग म्हणून मंगळवारी खासदार किरीट सोमय्या यांनी तलावाला भेट देत त्याची पाहणी करून झालेल्या दुरावस्थेसाठी पालिका अधिकाऱ्यांना फैलावर घेत त्वरित समस्या सोडवण्याचे आदेश दिले आहेत.
मुंबईच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या पवई तलावात गटार आणि सांडपाणी सोडले जात असून, यामुळे तलावाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. महानगरपालिकेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे व कामचुकार भूमिकेमुळे या तलावाला हळूहळू गटारगंगेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. पवई तलाव वाचवण्यासाठी आवर्तन पवईने, निसर्ग रक्षणासाठी झटणारी संस्था पॉज मुंबई आणि पवईकरांच्या साथीने “पवई तलाव मोहीम” अंतर्गत ऑनलाईन याचिका सुरु केली आहे. ज्यास मुंबईकरांचा मोठा प्रतिसाद मिळत असून, अनेक राजकीय नेते सुद्धा आता जनतेच्या या प्रश्नासाठी पुढे येत आहेत. याचाच भाग म्हणून मंगळवारी खासदार किरीट सोमय्या यांनी पवई तलावाची पाहणी करून परिस्थिती जाणून घेतली.
तलावाच्या पाण्यात सोडली जाणारी घाण, अस्वच्छता आणि तलाव भागात झालेले अतिक्रमण पाहून सोमय्या यांनी ‘तीन दिवसांत जर यावर काही ‘अॅक्शन प्लान’ आला नाही तर महापालिकेच्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचा सज्जड दमही त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिला. मात्र ज्या पंचतारांकित हॅाटेल्स व कमर्शियल कॉप्लेक्समधून घाण व मैला सोडला जातोय त्यावर बोलणे त्यांनी टाळले.
यावेळी खा. सोमय्या यांच्या सोबत पालिकेचे गटनेते मनोज कोटक, सुधार समिती अध्यक्ष प्रकाश गंगाधरे यांच्यासह पालिका अधिकारी उपस्थित होते.
पवई तलावाच्या होत चाललेल्या दुरावस्थेबद्दल केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्र लिहून त्यांनी तक्रार सुद्धा दाखल केली आहे. पालिका अधिकाऱ्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करावे. तलाव भागात जाणारे गटाराचे घाण पाणी पालिकेतर्फे त्वरित थांबण्यात यावे. तलाव भागात निर्माण झालेले अतिक्रमण लवकरात लवकर हटवण्यात यावेत अशी मागणी त्यांनी या पत्रात केलेली आहे.
सोमय्यांच्या या धावत्या पाहणीत पुरेसे गांभीर्य नसले तरीही या अचानक भेटीने पवईकरांच्या आशा मात्र वाढलेल्या आहेत.
पवई तलाव बचाव मोहिमेत सहभागी होण्यासाठी इथे क्लिक करा
आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा
No comments yet.