पाठीमागील काही वर्षात महिला अधिकाऱ्यांनी भारतीय सैन्य दलात आपला ठसा उमठवला आहे. याच परंपरेला पुढे घेवून जात पवईकर भारतीय शसस्त्र सेना (इंडियन आर्मी) अधिकारी कॅप्टन तानिया शेरगिल आजच्या (२६ जानेवारी २०२०) प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सर्व पुरुषांच्या तुकडीचे नेतृत्व करणार आहे. चौथ्या पिढीतील लष्करी अधिकारी असणारी कॅप्टन तानिया सिग्नल कॉर्पसमध्ये कार्यरत आहे. दिल्लीच्या राजपथवर परेडचे नेतृत्व करत पवईकर कॅप्टन शेरगिल यांनी केवळ देश आणि तिच्या कुटुंबाचा अभिमानच वाढवला नसून, पवईकरांची मान अभिमानाने उंच केली आहे. तिची ही ऐतिहासिक कामगिरी असंख्य तरुण पुरुष आणि सर्व स्तरातील स्त्रियांना प्रेरणा देईल आणि निःसंशयपणे नव्या तरुण पिढीला सैन्यात सहभागी होण्यास प्रवृत्त करेल.
तिच्या लष्करात सामील होण्याच्या इच्छेबद्दल आवर्तन पवईशी बोलताना कॅप्टन शेरगिल म्हणाल्या, “सैन्यदलात सामील होण्याची मला मोठी इच्छा होती. माझ्या मनात नेहमीच वर्दी आपल्या शरीरावर परिधान करण्याची इच्छा होती. मी शाळेत जात असताना सैन्यदलात असणाऱ्या माझ्या वडिलांना अनेकदा मी आपला गणवेश परिधान करुन तयार होत असताना पाहिले आहे. त्यात त्यांचा रुबाब वेगळाच वाटे. माझ्या वडिलांचा गणवेश मला फिट होत नसताना सुद्धा तो ढिला-ढाला गणवेश परिधान करून मी सैनिक असल्याचे भासवत संपूर्ण घरभर धावत असे. आरशासमोर उभे राहून फौजी सलाम देण्याचा सराव करीत असे. माझ्या महाविद्यालयाच्या शेवटच्या वर्षात मला टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये (टीसीएस) प्लेसमेंट मिळाल होत, मात्र मला सैन्यात जाण्याची इच्छा होती.”
ती पुढे म्हणाली, “आता सैन्यदलात तरुण मुलींना आपल्या देशाची सेवा करण्याची अतुलनीय संधी मिळाली आहे. मला विश्वास आहे की आपल्या पिढीला हा एक विशेषाधिकार मिळाला आहे, कारण आज स्त्रियांना सैन्यदलात सरळ अधिकारी म्हणून जाण्याची संधी मिळाली आहे. मला देशाची सेवा करण्याची एक उत्कृष्ट संधी दिसली आणि मी त्याचा पुरेपूर फायदा घेतला.”
चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडेमीतील (ओटीए) अवघड प्रशिक्षणांबद्दल विचारले असता ती म्हणाली, “हे प्रशिक्षण खूप कठोर आणि वेदनादायक असेल हे मला माहित होते, पण हे प्रशिक्षण आवश्यक आहे नागरिकांमधून अधिकाऱ्याच्या निर्मितीसाठी. माझे वडील (कॅप्टन सुरत गिल) यांनी देखील चेन्नईच्या ओटीएमधून अधिकारी म्हणून प्रशिक्षण घेतले होते आणि त्याच ठिकाणी प्रशिक्षण घेण्याची संधी मला मिळाली. मला माझे लेफ्टनंट तारे मिळताना पाहिल्यानंतर ते अत्यंत भावुक झाले होते.”
कॅप्टन तानिया शेरगिल यांच्या यशातून सैन्यात महिलांसाठी मार्ग मोकळा आहे याचे प्रत्यय येतानाच कामगिरी, परिश्रम, धैर्य आणि दृढनिश्चय काय साध्य करू शकते याचे एक मानक सुद्धा तिने सिद्ध केले आहे.
No comments yet.