जोरदार पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याची शक्यता निर्माण झालेली असतानाच, पवईतील चैतन्यनगर येथे बुधवारी पहाटे घरांवर दरड कोसळल्याने झोपेत असणारी तीन कुटुंबे घरात अडकून पडली. स्थानिकांनी धावपळ करत अडकलेल्या लोकांना बाहेर काढले. या घटनेत येथील तीन घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, दोन लोक किरकोळ जखमी झाले आहेत, ज्यामध्ये एका आजारी महिलेचा समावेश आहे.
पावसाळ्यापूर्वी दरडींच्या जवळ राहणाऱ्या मुंबईकरांना पालिकेतर्फे नोटिसा पाठवून सावध करण्यात येते. पवईतील चैतन्यनगर, इंदिरानगर, गौतमनगर या डोंगराळ भागात जवळपास दिडशे कुटुंबे जीव मुठीत घेऊन राहत आहेत. बुधवारी पहाटे लोक साखरझोपेत असतानाचा येथील डोंगराळ भागात असणारे झाड आधार संपुष्टात आल्याने उन्मळून पडले आणि सोबतच दरडही खाली वसलेल्या झोपडपट्टीवर कोसळली. ज्यात उमाशंकर गुप्ता, यशवंत शिंदे, राजभर आणि तिलकचंद उपाध्याय यांच्या घरावर दरड पडल्याने घराचे पत्रे फुटून घरात झोपेलेले लोक जखमी झाले. गुप्ता यांच्या घरावर मोठा दगड कोसळल्याने पत्र्याखाली दबून संपूर्ण परिवार अडकून पडला. गुप्ता कुटुंबियांना मदतीसाठी शेजाऱ्यांना हाक मारण्यासही वेळ मिळाला नाही.
घरांवर दरड पडण्याच्या झालेल्या झोरदार आवाजामुळे जागे झालेल्या शेजाऱ्यांनी सावधानता बाळगत गुप्ता परिवाराला बाहेर काढले. मात्र, लकव्याने अपंग असलेल्या शैला गुप्ता दरडी खाली आल्याने, त्यांना वाचवताना शेजाऱ्यांना प्रयत्नांची शिकस्त करावी लागली. येथील कुटुंबांसाठी काळ आला होता, मात्र वेळ आली नव्हती, परंतु या घटनेमुळे आता येथील रहिवाशांनी दरडींचा धसकाच घेतला आहे.
“पावसाळ्याच्या तीन ते चार महिने आधीपासून आम्ही पालिकेत या समस्येबाबत धाव घेतली होती, मात्र याबाबत कोणतीच ठोस पाऊले उचलली गेली नाहीत. उलट दरड कोसळल्यानंतर १३ जुलै रोजी सावधानता बाळगण्याची नोटीस लावण्यात आली” असे यावेळी आवर्तन पवईशी बोलताना स्थानिक रहिवाशी तिवारी यांनी सांगितले.
बाहेर पाऊस कोसळत आहेच, त्यात सोबत वरील वस्त्याचे सांडपाणी वाहून जाण्यास मार्ग नसल्याने ते पाणी देखील दरडीवरून आमच्या परिसरात येते. अनेक ठिकाणी दरडी अधिक मोकळ्या झाल्या आहेत. अशा समस्या शीला गायकवाड यांनी पाहणी करण्यासाठी पोहचलेल्या युथ पॉवर संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विरेंद्र धीवर यांच्या समोर मांडल्या.
युथ पॉवर संघटनेकडून स्थानिकांच्या सह्यांचे पत्र पालिकेच्या एस विभागाला दिले असून, यानंतर आपत्ती व्यवस्थापन विभागांच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देणार असल्याचे सांगितले.
आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा
No comments yet.