पवईत किडनी रॅकेटचा पर्दाफाश, चार जणांना अटक

kidney racketलोकांना फसवून, खोट्या कागदपत्रांच्या आधारे संमती मिळवून किडनी रॅकेट चालवणाऱ्या टोळीचा पवई पोलिसांनी समाजसेवकांच्या मदतीने गुरुवारी पर्दाफाश केला आहे. भादवि कलम १२० (ब), ४१९, ४२०, ४६५, ४६७, ४६८ आणि ४७१ नुसार गुन्हा नोंद करत मुख्य सूत्रधारासह चार लोकांना या गुन्ह्यात अटक केली आहे. अटक आरोपींमध्ये रुग्णाच्या मुलाचा सुद्धा समावेश आहे.

मुख्य सुत्रधार भैजेंद्र भिसेन (४२), भरत शर्मा (६२), इक़्बाल सिद्दिकी (४०) व किशन जैस्वल (रुग्णाचा मुलगा) अशी अटक आरोपींची नावे असून, शुक्रवारी त्यांना अंधेरी कोर्टात हजर केले जाईल.

गुरुवारी शस्त्रक्रिया सुरु होण्यापूर्वीच पवई पोलिसांनी समाजसेवकांच्या सोबत पवईतील हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये छापा टाकून रुग्ण ब्रिजकिशोर जैस्वाल (४८) यांनी खोटी कागदपत्रे सादर करून किडनी दाता ही त्याची पत्नी असल्याचे भासवले असल्याचे हॉस्पिटलला सांगत, खोट्या कागदपत्रांच्या आधारे चाललेले किडनी रॅकेट उध्वस्त केले. तपासी अधिकारी किडनीदाता महिलेची भूल उतरण्याची प्रतीक्षा करत असून, तिच्या जवाबानंतरच सर्व काही स्पष्ट होईल, असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

“तक्रारदार समाजसेवक महेश तन्ना आणि इन्टेक संघटनेच्या लोकांनी दिलेल्या माहितीच्या आणि कागदपत्रांच्या आधारे पवई पोलिसांच्या पथकाने हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये जावून, तेथील अधिकाऱ्यांना जैस्वाल यांनी किडनीदाता त्याची पत्नी असल्याची खोटी कागदपत्रे सादर केल्याने शस्त्रक्रिया थांबवण्याची विनंती केली. पोलीस तपासात ताब्यात घेण्यात आलेल्या सर्व आरोपींनी त्यांचा यात सहभाग असल्याचे कबूल केले आहे. ज्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे”, असे आवर्तन पवईशी बोलताना पवई पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

“सुरत येथील कपड्याचे व्यापारी ब्रिजकिशोर जैस्वाल यांनी आपल्या मुलासह १५ दिवसापूर्वी हिरानंदानी हॉस्पिटलला येऊन तपासणी केल्यावर त्यांना किडनी प्रत्यारोपण करावे लागणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. ज्यानंतर जैस्वाल परिवार हे भिसेन यांच्या संपर्कात आले आणि त्यांनी किडनी मिळवून देण्याचे आश्वासन दिले. किडनी दान करणारी व्यक्ती ही रक्ताच्या नात्यातील असावी असा नियम असल्याने भिसेन याने दाता महिलेची खोटी कागदपत्रे बनवून ती जैस्वाल यांची पत्नी असल्याचे पुरावे हॉस्पिटलमध्ये सादर करून गुरुवारी १४ जुलै रोजी शस्त्रक्रिया निश्चित करण्यात आली. मात्र तत्पूर्वीच काही समाजसेवकांनी दिलेल्या माहितीमुळे सत्य समोर आले आणि आम्ही जैस्वाल यांच्या मुलासह मुख्य सुत्रधार भैजेंद्र भिसेन व त्याचे सहकारी भरत शर्मा आणि इक़्बाल सिद्दिकी यांना अटक केली आहे”, असे आवर्तन पवईशी बोलताना तपासी अधिकाऱ्याने सांगितले.

ते पुढे म्हणाले, “किडनी दान करणारी महिला ही भूल दिलेली असल्याने व शुद्धीत नसल्याने तिचा जवाब नोंद होवू शकला नाही. तिच्या जवाबानंतरच संपूर्ण प्रकरण स्पष्ट होऊ शकेल. आम्ही अधिक तपास करत असून, या रॅकेटमध्ये अजून किती लोक काम करत आहेत. यांनी अजून कोठे कोठे अशा प्रकारे गुन्हे केले आहेत याचा आम्ही तपास करत आहोत.”

याबाबत हॉस्पिटलने आपली बाजू मांडताना सांगितले, “जैस्वाल यांनी लग्नाचे पुरावे, आधार कार्ड व संबंधित सर्व कागदपत्रे सादर करून किडनीदाता ही त्याची पत्नी असल्याचे स्पष्ट केले होते. यासाठी बनवण्यात आलेल्या कमिटीने सर्व कागदपत्रांची तपासणी करून प्रत्यारोपणास संमती दिली होती. आम्ही यात कोणताही निष्काळजीपणा किंवा चूक केलेली नाही. आमच्या हॉस्पिटलच्या बाहेर एखादे किडनी रॅकेट चालत असेल तर आम्ही काय करू शकतो. कायदेशीररित्या रुग्ण आणि दाता दोघांचेही संमतीच्या वेळेचे चित्रीकरण आम्ही करून ठेवलेले आहे. पोलिसांना आम्ही संपूर्ण मदत करत आहोत.”

“हे खूप मोठे किडनी रॅकेट चालत आहे. आमच्या सहकाऱ्यांनी बरेच पुरावे जमा केले आहेत. आतापर्यंत मिळालेल्या माहितीच्या आधारे यापूर्वी जवळपास ३५ किडनी प्रत्यारोपण खोट्या कागदपत्रांच्या आधारे या रॅकेटच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आलेले आहेत. शेवटचे प्रत्यारोपण हे मार्च महिन्यात केले गेले होते. ज्यानंतर आज होणाऱ्या शस्त्रक्रियेबद्दल माहिती मिळताच, आम्ही पोलिसांना पुरावे सादर करत हे रॅकेट उध्वस्त केले आहे”, असे तक्रारदार महेश तन्ना यांनी यावेळी बोलताना सांगितले.

किडनी दान करणाऱ्या व्यक्तीला हे रॅकेट पंधरा ते वीस लाख रुपये देण्याचे कबूल करते. मात्र, काम झाल्यावर प्रत्यक्षात ३ ते ३.५ लाख रुपयेच दिले जातात”,असे आवर्तन पवईशी बोलताना या किडनी रॅकेटला उघड करणाऱ्या इन्टेक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

 

, , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!