चांदिवलीतील खैरानी रोडवरील भानू फरसाण स्वीट दुकानाला भीषण आग लागल्याची घटना आज पहाटे ४.१५ वाजता घडली. या आगीत होरपळून १२ कामगारांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती सुद्धा समोर येत आहे. अग्निशमन दलाच्या ३ फायर इंजिन व ४ पाण्याच्या बंबांच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असून, बचावकार्य सुरु आहे.
खैरानी रोडवरील मखारीया कम्पाऊंडमध्ये गाळा क्रमांक १ मध्ये भानू फरसाण हे मिठाईचे दुकान आहे. अग्निशमन दलाच्या प्राथमिक अहवालानुसार शॉर्टसर्किटमुळे सकाळी ४.१५ वाजण्याच्या सुमारास याच्या तळमजल्यावर आग लागली. यावेळी दुकानातील कामगार दुकानाच्या आतमध्ये असणाऱ्या पोटमाळ्यावर झोपलेले होते. काही कळायच्या आत कामगार झोपलेला पोटमाळ कोसळून आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने जवळपास १८ कामगार आगीत अडकून पडले.
अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवत बचावकार्य सुरु केले असताना जवळपास १२ कामगारांचा होरपळलेल्या अवस्थेत बाहेर काढून घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल केले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले आहे.
आगीत जळलेल्या कामगारांची ओळख अजून पटू शकली नसून, पोलीस त्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहे असे यावेळी बोलताना साकीनाका पोलीस ठाण्याचे वपोनि धर्माधिकारी यांनी सांगितले.
No comments yet.