स्वस्तात गाडी मिळवून देण्याच्या बहाण्याने ठगणाऱ्या भामट्याला पवई पोलिसांनी ठोकल्या बेड्या

बँकेने जप्त केलेल्या गाडय़ा कमी किमतीत मिळवून देतो सांगून मुंबईकरांना लाखो रुपयांना ठगणाऱ्या भामटय़ाला पवई पोलिसांनी अटक केली आहे. सुनील किशनचंद जगतीयानी उर्फ मनीष लालवाणी (४१) असे अटक आरोपीचे नाव आहे. सुनीलने मुंबई, ठाणेसह पुणे, दिल्ली आणि हरियाणा भागात अनेकांची फसवणूक केली असून, त्याच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यांत गुन्ह्यांची नोंद आहे.

हप्ते न-भरल्याने बँकेने जप्त केलेली गाडी तुम्हाला स्वस्तात मिळवून देतो असे सांगून मनीष लालवाणी नामक इसमाने पवई येथील एका व्यक्तीकडून लाखो रुपये घेतले होते. पैसे मिळताच मोबाईल बंद करून गाडीही न दिल्याने त्याच्या विरोधात पवई पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचा तपास करत असताना, सुनील नामक एक व्यक्ती लोकांकडून स्वस्तात वाहने मिळवून देण्याचा बहाणा करून बनावट नावाने पैसे घेवून फसवणूक करत असल्याची माहिती खबऱ्याकडून पवई पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सपोनि सचिन वाघ यांना मिळाली होती. याच आधारावर उल्हासनगर येथून सुनीलला अटक करण्यात आली.

“सुनील हा लोकांना मनीष लालवाणी, राजू भाई अशा खोट्या नावाने आपली ओळख करून देतो. बँकेत माझी ओळख आहे, बँकेने जप्त केलेल्या कार, टेम्पो, ट्रक या गाड्या कमी किमतीत तुम्हाला मिळवून देतो सांगून ग्राहकांकडून लाखो रुपये मनीष लालवाणी या बनावट नावाच्या खात्यावर वर्ग करायला सांगत असे. एकदा पैसे खात्यावर जमा झाले, कि त्या ग्राहकाला दिलेला फोन बंद करून फरार होतो,” असे याबाबत बोलताना तपासी अधिकारी सपोनि सचिन वाघ यांनी सांगितले.

सुनील उर्फ मनीष उर्फ राजू भाई याच्यावर, ठाणे, मुंबई भागात पवईसह एमआयडीसी पोलीस ठाणे, साकीनाका पोलीस ठाणे, उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस ठाणे, माजीवाडा पोलीस ठाणे, विठ्ठलवाडी पोलीस ठाणे, कल्याण पोलीस ठाणे, पुणे, दिल्ली आणि हरियाणा येथे २५ पेक्षा जास्त गुन्ह्यांची नोंद आहे.

भादवि कलम ४२०, ४६५, ४६८ अन्वये गुन्ह्यात अटक करून सुनील याला कोर्टात हजर केले असता ३१ जानेवारी पर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. असे पवई पोलीस ठाण्याचे वपोनि अनिल पोफळे यांनी सांगितले.

गुन्हा उघड करण्यासाठी सपोनि सचिन वाघ सह पो. ह. राजाराम कुंभार, पो. ना. संतोष देसाई, पो. ना. अमित जगताप, पो. शि. अजय बांदकर, पो. शि. अविनाश जाधव, पो. शि. सचिन गलांडे यांनी विशेष मेहनत घेतली.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!