सैन्यात अधिकारी असल्याचे सांगत एका माजी सैनिकाला ३.५ लाखाचा गंडा घातल्याची घटना सोमवारी पवईत घडली आहे. या संदर्भात पवई पोलीस माहिती तंत्रज्ञान कायदा अंतर्गत गुन्हा नोंद करून अधिक तपास करत आहेत.
पवईतील हिरानंदानी भागात राहणारे मुकेश भार्गवा यांना आपले घर भाड्याने द्यावयाचे असल्याने त्यांनी याबाबत असे व्यवहार करणाऱ्या एका वेबसाईटवर आपली जाहिरात दिली होती. “जाहिरात बघून एका व्यक्तीने तक्रारदार यांना फोन करून तो सैन्यात अधिकारी असल्याचे सांगत सदर घर भाड्याने घेण्यास तयार असल्याचे सांगितले,” असे याबाबत बोलताना पोलीस म्हणाले.
दोघांच्यातील सर्व व्यवहार नक्की झाल्यावर समोरील व्यक्तीने आपण ऑनलाईन पैसे पाठवत असल्याचे तक्रारदार यांना सांगितले. “सरकारी विभागात असल्याचे कारण सांगत तुम्हाला १० रुपये माझ्या खात्यावर पाठवावे लागतील असे भामट्याने तक्रारदार यांना सांगितले. त्या प्रमाणे तक्रारदार यांनी १० रुपये त्या व्यक्तीने दिलेल्या खात्यावर पाठवले.” असे याबाबत बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, “४९ हजार रुपये तक्रारदार यांच्या खात्यावर पाठवत असल्याचे भासवत सायबर चोरट्याने तक्रारदार यांच्या खात्यातून विविध व्यवहाराच्या माध्यमातून ३.५ लाख रुपये उडवले. काहीतरी गडबड असल्याचे लक्षात येताच फिर्यादी यांनी पवई पोलीस ठाण्यात धाव घेत फसवणुकीचा गुन्हा नोंद केला आहे.”
No comments yet.