चांदिवली, नहार अम्रित शक्ती येथे राहणारे ५५ वर्षीय इसम इबनी हसन यांची गोळ्या घालून हत्या केल्याची घटना आज दुपारी १२.२० वाजण्याच्या सुमारास नहार कॉम्प्लेक्स, गेट क्रमांक ७ जवळ घडली. कौटुंबिक वादातून त्यांच्या जवळच्या नातेवाईकाने ही हत्या केल्याची प्रथमदर्शनी समोर येत आहे. हत्येनंतर आरोपी नातेवाईकाने साकीनाका पोलीस ठाण्यात हजर होत आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. इमाम उद्दीन (६०) असे हत्या करणाऱ्या आरोपी नातेवाईकाचे नाव आहे.
या संदर्भात साकीनाका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चांदिवली, नहार अम्रित शक्ती येथील सोसायटीत राहणारे इबनी हसन आणि इमाम उद्दीन यांच्यात काही दिवसांपासून कौटुंबिक कारणातून वाद सुरु होते. हा वाद विकोपाला पोहचला होता. याच रागातून हसन हे आपल्या इमारतीतून बाहेर निघताच इमाम उद्दीन यांनी बंदुकीतून त्यांच्यावर गोळ्या झाडत त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला.
‘हल्ल्यानंतर आरोपी नातेवाईकाने साकीनाका पोलीस ठाण्यात हजर होत हसन यांची गोळी मारून हत्या केल्याची कबुली दिली आहे’ असे याबाबत आवर्तन पवईशी बोलताना साकीनाका विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त मिलिंद खेतले यांनी सांगितले.
जखमी हसन याना घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
‘आम्ही घटना स्थळावरून बंदूक ताब्यात घेतली असून, आरोपी इमाम उद्दीन यांचा जवाब नोंदवत आहोत. कौटुंबिक वादातून ही हत्या घडली असली तरी हत्येमागचे नक्की कारण काय आहे याचा आम्ही शोध घेत आहोत’ असे याबाबत बोलताना साकीनाका पोलिसांनी सांगितले.
आरोपी इमाम उद्दीन याने साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्ह्यात वापरलेली बंदूक जमा केली असून, घटनास्थळी सापडलेली बंदूक ही मयत इसमाची असावी असा अंदाज सुद्धा यावेळी बोलताना साकीनाका पोलिसांनी व्यक्त केला आहे.
No comments yet.