पवई, आयआयटी परिसरात काम करणाऱ्या मजुरांच्या पाच अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना नुकतीच पवईत उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे एका गुन्ह्यातील पीडित हे दुसऱ्या गुन्ह्यातील आरोपी असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पवई पोलिसांनी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले असून, पहिल्या गुन्ह्यात एका वीस वर्षांच्या तरुणाला तर पहिल्या गुन्ह्यात पिडीत असणाऱ्या दोन मुलांना दुसऱ्या गुन्ह्यात आरोपी म्हणून अटक केली आहे.
आयआयटीमध्ये इमारतींचे बांधकाम आणि दुरुस्तीचे काम करणाऱ्या मजुरांच्या मुलांना शिक्षणासाठी आणि काळजीसाठी एका सेंटरमध्ये पाठवले जाते. १४ मार्चला येथील एका शिक्षकाने ३ मुले अश्लील वर्तवणूक करताना पाहिले. त्यांना बाजूला घेवून चौकशी केली असता एका सात वर्षीय मुलाने याच ठिकाणी असणाऱ्या दोन मुलांनी त्याच्यासह अजून दोन मुलांसोबत लैंगिक अत्याचार केल्याची माहिती दिली. शिक्षकाने ही माहिती त्वरित पवई पोलिसांना दिली.
पवई पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल करून अत्याचार करणाऱ्या अल्पवयीन मुलांना ताब्यात घेवून चौकशी केली असता, त्या ठिकाणी राहणारा एका वीस वर्षाचा तरुण दोन महिन्यांपासून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करत असल्याची धक्कादायक माहिती त्या मुलांनी पोलिसांना दिली.
‘त्याचे बघून आम्ही देखील असेच करत असल्याचे या मुलांनी पोलिसांना दिलेल्या जवाबात म्हटले आहे’, असे याबाबत बोलताना पवई पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले.
मुलांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर २० वर्षांच्या मजुराविरुद्ध अनैसर्गिक अत्याचार आणि पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. तर दुसऱ्या घटनेत पहिल्या गुन्ह्यातील पीडित अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती पवई पोलिसांनी दिली.
No comments yet.