पवईमधील हिरानंदानी भागात कॉलेज विद्यार्थिनी समोर अश्लील वर्तन आणि अश्लील शेरेबाजी करणाऱ्या मोटारसायकल बहाद्दराला काल संध्याकाळी पवई पोलिसांनी अटक केली आहे. कल्पेश गोपीनाथ देवधरे (२७) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. तो सराईत गुन्हेगार असून, मुंबईभर विनयभंगाचे त्याच्यावर दोन डझनच्यावर गुन्हे नोंद आहेत.
रोजंदारीवर मिळेल ते काम करणारा कल्पेश हा कधी आपल्या आई सोबत असतो, तर कधी आपल्या भावासोबत. केवळ आनंदासाठी अशा प्रकारचे अश्लील वर्तन करत असल्याचे त्याने पोलीस तपासात स्पष्ट केले आहे.
पवई व्यतिरिक्त मुंबईतील घाटकोपर, डी एन नगर, गोरेगाव, चुनाभट्टी, कांदिवली, दिंडोशी, पार्कसाईट, बांगूरनगर आणि गोवंडी या भागात २० पेक्षा अधिक अशाच प्रकारे गुन्ह्यांची नोंद त्याच्या विरोधात आहे. यातील पार्कसाईट आणि बांगूरनगर भागात २, गोवंडी भागात ११ तर इतर पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी एक गुन्ह्याची नोंद आहे.
गुरुवारी, १३ जुलैला ४ विद्यार्थिनी कॉलेजमधून घरी परतत असताना, हिरानंदानीतील इटर्निया इमारतीजवळ पाठीमागून निळ्या रंगाच्या मोटारसायकलवरून आलेल्या एका तरुणाने त्यांच्यासमोर अश्लील वर्तन करत अश्लील शेरेबाजी केली होती. ज्याबाबत विद्यार्थिनीनी आपल्या पालकांच्या मदतीने पवई पोलिसांना माहिती दिल्यानंतर पवई पोलिसांनी भांदवि कलम ३५४ (डी), ५०९ नुसार गुन्हा नोंद करून तपास सुरु केला होता.
“परिसरात मिळालेल्या सिसिटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांना यामाहा कंपनीची ‘आर १५’ मॉडेलची मोटारसायकल असल्याचे स्पष्ट झाले होते. विद्यार्थिनीनी आपल्या जवाबात मोटारसायकलच्या नंबरचे शेवटचे चार क्रमांक दिले होते. मॉडेल आणि क्रमांकाशी मिळत्याजुळत्या किती मोटारसायकलची नोंदणी झाली आहे याची आम्ही माहिती मिळवली होती. त्याच आधारावर पनवेल, मालाड, गोवंडी, सांताक्रूझ या भागात आमची वेगवेगळी पथके शोध मोहीम राबवत असताना काल सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि हवालदाराच्या पथकाच्या हाती कल्पेश लागला” असे आवर्तन पवईशी बोलताना एका तपासी अधिकाऱ्याने सांगितले.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबत बोलताना सांगितले, “अटक आरोपी हा सराईत गुन्हेगार आहे. हिरानंदानी येथील घटनेपूर्वी विजय विहारजवळ सुद्धा त्याने एका विद्यार्थिनीशी अश्लील वर्तन केले होते. पुढे जावून त्याने हिरानंदानी इटर्निया इमारतीजवळ तक्रारदार तरुणीशी अश्लील वर्तन व शेरेबाजी करून तेथून पळ काढला होता. घाटकोपर येथे पुन्हा तशाच प्रकारे वर्तन करून गोवंडी येथील गिडवानी रोडवर एका तरुणीशी अश्लील वर्तन करून तिचा पाठलाग करत असताना तरुणीने आरडाओरड केल्यावर पब्लिकने त्याला पकडून चोप देवून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. १६ तारखेला त्याला जामीन मंजूर झाला आणि तो बाहेर पडला.”
कल्पेशवर मुंबईभर विनयभंगाचे सर्वात जास्त गुन्हे नोंद असून, अपहरण आणि खंडणीच्या गुन्ह्यांची नोंद सुद्धा त्याच्यावर आहे. आज त्याला कोर्टात हजर केले असता पोलीस कोठडी देण्यात आली आहे. त्याने मुंबईत अजूनही कोठे अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत का? याचा पवई पोलीस तपास करत आहेत.
He should be serioisly punish and publish his identity to all over mumbai and maharashtra otherwise in future he will be done serious offence.
वरील आरोपीवर कायदेशीर कठोर कार्यवाही होणे गरजेची आहे व तसेच या आरोपीची ओळख सर्वत्र प्रसारीत करावी जेणे करुन हा आरोपी व यासारखे ईतर विकरूत माणसे यापुढे कोणतेही विकरूती करण्यस हिम्मत करणार नाही, समाजातून अशी घाण काढून टाकणे गरजेचे आहे.
अगदी बरोबर. माध्यमांनी त्याचा फोटो छापून आधीच काही कार्य केले आहे. पोलिसांनी पुढील कार्य करावे.