पवई परिसरात आपल्या आईला भेटायला आलेला व्यक्तीची मोटारसायकल चोरी करून घेवून जाणाऱ्या २० वर्षीय तरुणाला शुक्रवारी पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. करण विनकरे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, पोलिसांनी त्याच्याकडून चोरी केलेली मोटारसायकल हस्तगत केली आहे.
भांडूप येथे राहणारे फिर्यादी देवेंद्र पोतदार हे १२ ऑक्टोंबरला पवईत त्यांच्या आईला भेटण्यासाठी आले होते. पदमावती रोडवर त्यांनी आपली मोटारसायकल (क्रमांक एमएच०३ बीडी ३८७७) पार्क करून ते आपल्या आईला भेटण्यास गेले. आईला भेटून परत जाताना त्यांनी पार्क केलेली मोटारसायकल त्या ठिकाणी नसल्याची त्यांच्या लक्षात आले. याबाबत आसपास चौकशी केल्यानंतर त्यांनी पवई पोलीस ठाण्यात चोरीची (भादवि कलम ३७९) तक्रार नोंद केली होती.
तपासा दरम्यान सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक तरुण मोटारसायकल घेवून जाताना पोलिसांना आढळून आला होता. “सदर इमारत आणि आसपासच्या परिसरात फुटेज, फोटो दाखवून केलेल्या चौकशीत याच परिसरात पूर्वी दूध टाकणाऱ्या एका मुलाशी त्या तरुणाचे वर्णन मिळत असल्याही माहिती मिळाली होती,” असे याबाबत बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.
“आमच्या गुप्त बातमीदाराकडून हरिओमनगर भागात राहणाऱ्या करण नामक तरुणाकडे चोरीला गेलेल्या वर्णनाची मोटारसायकल असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने परिसरात पाळत ठेवून आम्ही करणला ताब्यात घेवून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली,” असे याबाबत बोलताना गुन्हे प्रकटीकरण अधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी सांगितले.
“अटक आरोपीकडून चोरीस गेलेली मोटारसायकल हस्तगत करण्यात आली आहे.” असे यासंदर्भात बोलताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबुराव सोनावणे म्हणाले.
सदर गुन्हा वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबुराव सोनावणे आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीकृष्ण हरगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विनोद पाटील, पोलीस हवलदार तानाजी टिळेकर, पोलीस नाईक बाबू येडगे, पोलीस नाईक जवाहरलाल राठोड, पोलीस नाईक आदित्य झेंडे, पोलीस नाईक अभिजित जाधव, पोलीस शिपाई अशोक परब आणि पोलीस शिपाई प्रमोद यांनी उघडकीस आणला.
No comments yet.