मुंबईतील पहिलेवहिले मगर उद्यान पवई तलावात बनवण्याचे महापालिकेचे स्वप्न जवळपास भंगल्यात जमा आहे. मेट्रो सहा प्रकल्पा अंतर्गत लोखंडवाला-जोगेश्वरी-पवई-विक्रोळी-कांजुरमार्ग असा मेट्रो सहाचा कॉरीडोर निश्चित केला आहे. या मेट्रो-सहा प्रकल्पाच्या कामात पवईमधील पवई तलाव परिसरातील काही भाग बाधित होणार असल्याकारणाने प्रस्तावित मगर उद्यानाचा विचार मेट्रो पूर्ण झाल्यानंतर केला जाणार आहे.
२०० हेक्टर जागेत निसर्गरम्य परिसरात असणाऱ्या या तलाव परिसरात पर्यटकांची गर्दी असते. मुंबईच्या मुख्य पर्यटनस्थळापैकी एक स्थान निर्माण झाल्यामुळे पालिकेतर्फे पाठीमागील काही वर्षांत शंभर कोटीहून अधिक निधी खर्च करून सुशोभिकरण करण्यात आले आहे.
पवई तलावात गेल्या काही वर्षात प्रदूषणात प्रचंड वाढ झाली आहे. आसपासच्या निवासी संकुलांमधील घाण सांडपाणी तलावात सोडले जाते. उत्सवांच्या नावावर कचरा, निर्माल्य तलावात फेकले जाते. सोबतच मोठ्या प्रमाणात अवैध मासेमारीही चालते. ज्यामुळे तलावातील जलचरांसह, मगरींच्या जीविताला धोका पोहचवणारे वातावरण निर्माण झाल्यामुळे जलचरांसह मगरींची संख्या कमी होत चालली आहे.
जलचरांसह मगरींचे संवर्धन करण्यासोबतच त्यांच्यासाठी अनुकूल निवास निर्माण करण्यासाठी पालिकेने तलाव परिसरात मगरीचे उद्यान निर्माण करण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. मात्र पुढील काही वर्षात येथून जाणाऱ्या मेट्रो ६ प्रकल्पात येथील काही भाग बाधित होत असल्यामुळे प्रस्तावित मगरीचे उद्यान तूर्तास तळ्यात-मळ्यात दिसत आहे.
पवई तलावाच्या पाण्याची गुणवत्ता वाढवण्याच्या दृष्टीने एरिएशन व डिओ मोनेटरिंग सिस्टिम बसवून तलावात येणारे सांडपाणी वळवण्यासाठी पाणी पुरवठा व मलनि:स्सारण प्रकल्प खात्यामार्फत काम सुरु आहे. मेट्रो सहा प्रकल्पाचे कामाला सुरुवात झाली असून, पवई तलाव परिसरातील काही भाग बाधित होणार असल्याने मगर उद्यान बांधल्यास ते बाधित होणार आहे. त्यामुळे उद्यानाचा प्रकल्पच तूर्तास बाजूला काढावा लागला असल्याची माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
पवई तलावाच्या स्वच्छतेसाठी कॅनेडीअन कंपनीसोबत नुकतीच चर्चा झाली आहे. या चर्चेनुसार जागतिक स्तरावर पवई तलावाची स्वच्छता केली जाणार आहे. तलावातील मलवाहिनी बंद करून सांडपाणी दुसऱ्या मलवाहिनीतून वळविण्याच्या प्रकल्पावर सध्या विचार सुरु आहेत. यानंतर मगर उद्यानाच्या प्रकल्पाचा विचार केला जाणार असल्याबाबत सुद्धा पालिका म्हणणे आहे.
पवई तलावात जलक्रीडा सुरू करण्याबाबतचा प्रकल्प सुद्धा विचाराधीन असून, जलक्रीडा सुविधा सुरू झाल्यास स्कुबा डायव्हिंग, वॉटर पोलो, बोट रेसिंगचा आनंद घेता येणार आहे.
No comments yet.