बांधकाम व्यवसायातील प्रसिद्ध उद्योगपती निरंजन हिरानंदानी यांच्या नावाने इंटरनेटवर विविध सोशल नेट्वर्किंग अकाऊंट सुरु करून त्यातून एक अज्ञात व्यक्ती निरंजन हिरानंदानी असल्याचे भासवून लोकांशी आणि मित्रांशी चर्चा करत असल्याची तक्रार नुकतीच पवई पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली आहे. हिरानंदानी समूहाच्या माहिती – तंत्रज्ञान विभागातर्फे ही तक्रार नोंद करण्यात आली आहे.
हिरानंदानी समूहाचे व्यवस्थापकीय संचालक निरंजन हिरानंदानी यांची संपूर्ण ओळख वापरत फेसबुक, इंस्टाग्राम, लिंक्डइन या सोशल नेट्वर्किंग साईटवर हुबेहूब नक्कल करणारी अकाउंट बनवण्यात आली असून, हिरानंदानी यांच्या नंबरशी मिळत्या जुळत्या नंबरवर व्हाटसअप अकाउंट तयार करून लोकांशी आपण हिरानंदानी असल्याचे भासवून ‘माझ्याबद्दल तुम्हाला काय माहित आहे?’ अशी विचारणा करून त्यांची वैयक्तिक आणि व्यावसायिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न या अकाउंटसच्या माध्यमातून केला गेला आहे.
सोशल नेट्वर्किंग साईटवर निरंजन हिरानंदानी हे स्वतः बद्दल माहिती का विचारत आहेत, अशी विचारणा करणारे फोन जेव्हा त्यांना येवू लागले, तेव्हा त्यांना या बनावट अकाउंटबद्दलचे सत्य समोर आले. याबाबत त्यांच्या माहिती – तंत्रज्ञान विभागाच्या प्रमुखांनी पवई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.
“आमच्या माहिती – तंत्रज्ञान विभागाने चौकशी केली असता, हे बनावट अकाऊंट तीन आठवड्यापूर्वी बनले असल्याचे समोर आले. हे बनवण्यापाठीमागे काय उद्देश आहे हे पोलीस तपासानंतरच स्पष्ट होईल. मात्र, माझ्या मित्रांनी मला याबाबत माहिती दिली नसती तर मला हे समजूच शकले नसते,” असे प्रमुख माध्यम प्रतिनिधींशी बोलताना निरंजन हिरानंदानी यांनी सांगितले.
“बनावट अकाउंट बनवणाऱ्या व्यक्तीने अजूनतरी कोणत्याही प्रकारची आर्थिक मागणी हिरानंदानी यांच्या मित्रांकडे केली नाही आहे. मात्र याला वेळीच आळा घालणे आवश्यक आहे. हे जे कोणी करत आहे त्याच्यावर कारवाई न झाल्यास त्याचे मनोबल वाढेल आणि तो अजून काही लोकांशी सुद्धा अशाच प्रकारचे गुन्हे करू शकतो” असे नाव न जाहीर करण्याच्या अटीवर पवई पोलिसांच्या अधिकाऱ्यांना सांगितले.
“भादवि कलम ४६५, ४६८, ४७१ आणि माहिती तंत्रज्ञान कायदा ६६ (सि) नुसार गुन्हा नोंद करून आम्ही तपास सुरु केला आहे. सायबर क्राईमची मदत सुद्धा आम्ही घेत आहोत,” असे आवर्तन पवईशी बोलताना पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाई म्हाडेश्वर यांनी सांगितले. गुन्ह्याची पद्दत आणि अधिक माहिती देण्यास मात्र त्यांनी नकार दिला.
आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा
No comments yet.