गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या ! अशा गर्जणेत आबालवृद्धांच्या उत्स्फूर्त उत्साहात दिड दिवसाच्या अनेक घरगुती व गणपती बाप्पाचे रविवारी पुढच्या वर्षी लवकर येण्याचे निमंत्रण देवून भावपूर्ण आणि जड अंतकरणाने बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. पवई तलावाच्या दोन्ही गणेश विसर्जन घाटांसह, परिसरातील कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आले.
२०२० वर्ष कोरोनाचे वर्ष म्हणून ओळखले जावू लागले आहे. ह्या वर्षात आलेल्या अनेक सणांवर असणारे कोरोनाचे संकट पाहता खूप साध्या पद्धतीने सर्वच सण साजरे केले जात आहे. गणेशोत्सावर सुद्धा कोरोनाचे संकट पाहता या वर्षी हा उत्सव साजरा करताना काही नियम घालण्यात आले आहेत. मात्र तरीही गणेश भक्तांमधील उत्साह कमी नसून, मोठ्या उत्साहात शनिवारी गणरायाचे ठिकठिकाणी आगमन झाले.
दिड दिवस पाहूणचार घेतल्यानंतर रविवारी गणरायाने आपल्या भक्तांचा निरोप घेतला. पवईमध्ये मुख्य गणेशघाट आणि गणेशनगर गणेशघाट अशा दोन पारंपारिक ठिकाणी बाप्पाला भावपूर्ण निरोप देत गणरायांचे विसर्जन करण्यात आले. मात्र ह्या वर्षी येथे कोणालाही आपली मूर्ती घनेश विसर्जन घाटावर घेवून येण्यास संमती नव्हती. ठिकठिकाणी असलेल्या पालिकेच्या कलेक्शन सेन्टरमध्ये गणपती घेऊन त्यांना येथे विसर्जनासाठी आणले जात होते. तसेच पवईतील आयआयटी मेनगेट समोरील दुर्गादेवी शर्मा उद्यान, मोरारजी नगर, चांदिवली येथील संघर्षनगर आणि म्हाडा भागात गणेश मूर्तीच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली आहे. या तलावात सुद्धा मोठ्या प्रमाणात दिड दिवसाच्या बाप्पाचे विसर्जन करण्यात आले.
दुपारी १ वाजल्यापासूनच पवई आणि चांदिवलीतील अनेक भागातून गणपती विसर्जनासाठी निघाले. पवई आणि साकिनाका पोलिसांनी ठिकठिकाणी चोख बंदोबस्त ठेवत कोणताही गैरप्रकार होणार नाही याची काळजी घेतली होती.
रिद्धीसिद्धी आणि बुद्धीचा देवता बाप्पाचा मुक्काम घरात चैतन्य निर्माण करणारा ठरतो. त्याचे आगमनच जीवनातील दु:ख दूर करतो. ह्या वर्षी देशावर आलेले संकट गणरायाच्या कृपेने नक्कीच दूर होईल अशी भावना विसर्जन करण्यासाठी आलेल्या अनेक गणेशभक्तांनी यावेळी व्यक्त केली.
No comments yet.