पवईत राहणाऱ्या एका निवृत्त शास्त्रज्ञाला त्याच्या मैत्रिणीने ३.५ लाखाला ऑनलाईन गंडा घातल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. ऑनलाईन मैत्री जुळवणाऱ्या साईटवर तक्रारदार याच्याशी मैत्री करत आपण लंडनमधील औषध कंपनीत काम करत असल्याचे भासवून, मोठा व्यवसाय मिळवून देण्याचा बहाणा करून तिने हा डाव साधला. यासंदर्भात पवई पोलीस फसवणुकीचा गुन्हा नोंद करून तपास करत आहेत.
६७ वर्षीय तक्रारदार निवृत्त शास्त्रज्ञ सध्या सल्लागार म्हणून काम करत आहेत. १९ ऑक्टोबरला त्यांना रोझी मॉर्गन नामक महिलेचा ऑनलाईन मैत्री जुळवणाऱ्या साईटवर मैत्रीचा प्रस्ताव आला होता. त्या प्रस्तावाच्या स्विकारणीनंतर दोघांच्यात संभाषण सुरु झाले होते. यावेळी रोझीने आपण लंडन येथील एका नामांकित औषध कंपनीत कामाला असल्याचे सांगितले होते. “काही दिवसांनी दोघांनी आपले मोबाईल नंबर सुद्धा एकमेकांना देत त्याद्वारे संभाषण सुरु केले होते.
“सध्या औषधी तेलाला मोठी मागणी असून, त्यांची कंपनी ऑस्ट्रेलिया आणि ब्राझीलमधून पाच हजार डॉलरला हे तेल खरेदी करते. मात्र दिल्लीतील एक व्यापारी हेच तेल २५०० डॉलरला विकत असल्याचे सांगत ते तेल त्यांनी खरेदी करून ५ हजार रुपयांना विकले तर मोठा फायदा होईल, असा प्रस्ताव रोझी यांनी तक्रारदार यांच्यासमोर ठेवत नफ्यातील ७० टक्के देण्याचेही मान्य केले,” असे याबाबत बोलताना पोलिसांनी सांगितले.
तक्रारदार यांना या व्यवहाराची खात्री पटावी यासाठी विल्यम्स अन्ड्रू नामक व्यक्तीशी संपर्क करण्यास सांगण्यात आले. त्याच्याशी संपर्क साधला असता त्याने १०० लिटर तेल खरेदी करण्यास होकार दर्शवत आधी ३ लिटर तेल नमुना म्हणून पाठवण्यास सांगितले.
तक्रारदार यांनी रोझीने दिलेल्या दिल्ली येथील पुरवठादार विरेंद्र शर्मा यांना संपर्क साधत आपली १०० लिटर तेलाची मागणी केली. यावेळी समोरील व्यक्तीने त्यांना ३.५ लाख रुपये जमा करायला सांगत पैसे जमा होताच सामान पाठवून देण्यात येईल असे सांगितले.
पैसे पाठवल्यानंतरही बरेच दिवस सामान पोहचले नसल्याने त्यांनी शर्मा, रोझी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा संपर्क होत नसल्याने आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात येताच त्यांनी पवई पोलीस ठाण्यात धाव घेत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
पवई पोलीस भादवि आणि माहिती तंत्राद्यान कायद्यानुसार फसवणुकीचा गुन्हा नोंद करून अधिक तपास करत आहेत.
No comments yet.