टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडियाच्या २०२३च्या क्रमवारीत १५व्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे.
राज्यस्तरीय (State level) आणि जिल्हास्तरीय (District level ) टेबल टेनिस (Table Tennis) स्पर्धांमध्ये १० वर्षीय पवईकर वेदिका जैस्वाल (Vedika Jaiswal) हिने आपली चमक दाखवत ३ सुवर्ण (Gold), १ रौप्य (Silver) आणि २ कांस्य (Bronze) पदकांवर आपले नाव कोरत महाराष्ट्र संघासाठी आपली वाटचाल सुरु केली आहे. टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडियाच्या (TABLE TENNIS FEDERATION OF INDIA) २०२३च्या क्रमवारीत ती १५व्या स्थानावर आहे. वेदिका ही चांदिवली येथील पवार पब्लिक स्कूलमध्ये (Pawar Public school, Chandivali) ४थीत शिकत आहे. भविष्यात टेबल टेनिसमध्ये महाराष्ट्र आणि देशाचे प्रतिनिधित्व करण्याची तिची इच्छा आहे.
पवईतील अशोकनगर परिसरात राहणारी वेदिका पाठीमागील ३ वर्षापासून कोच इरिक फर्नांडीस (Eric Fernandes) यांच्याकडून टेबल टेनिसचे प्रशिक्षण घेत असून, ती एकही स्पर्धा हरलेली नाही.
मुंबई स्कूल स्पोर्ट्स असोसिएशन (MSSA) टेबल टेनिस स्पर्धा नुकत्याच अंधेरी पश्चिम येथील हंसराज मोरारजी पब्लिक स्कूलमध्ये पार पडल्या. जिल्हास्तरीय पातळीवर आयोजित या स्पर्धांमध्ये शेकडोच्या संख्येने स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धांमध्ये प्रत्येक प्रतिस्पर्ध्यावर मात करत या चिमुकलीने मुलींच्या १० वर्षीय गटात अंतिम फेरीत धडक मारली होती.
अंतिम फेरीत चुरशीच्या झालेल्या सामन्यात वेदिकाने आर्य विद्या मंदिरच्या (जुहू) हीर भट्टचा ११-६, ११-४, ११-४ असा सहज पराभव करत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. या स्पर्धेतील तिचे हे सलग दुसरे सुवर्ण पदक आहे. मुंबई स्कूल स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे २०२२मध्ये झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत देखील तिने सुवर्ण मिळवले होते.
तसेच महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशनतर्फे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात सांगली, नागपूर आणि नांदेड येथे टेबल टेनिस स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धांमध्ये महाराष्ट्रातून २७ जिल्ह्यातून स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धांमध्ये आपली चुणूक दाखवत वेदिकाने राज्यस्तरीय पातळीवर १ रौप्य तर २ कांस्य पदके जिंकली.
वेदिका आपली मोठी बहिण वैष्णवी जैस्वाल (Vaishnavi Jaiswal) हिला आपला आदर्श मानते. वैष्णवी देखील पवार पब्लिक स्कूलची माजी विद्यार्थिनी असून, ती टेबल टेनिसमध्ये महाराष्ट्र संघासाठी खेळते.
“वेदिकाला लहानपणापासूनच टेबल टेनिसबद्दल आवड निर्माण झाली होती. मोठ्या बहिणीला मैदानात खेळताना बघून तिच्यात ही रुची निर्माण झाली असावी. तिच्यातील आवड पाहून आम्ही तिला प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आणि तिने आपल्या खेळाने आमची मान आणखी उंचावली आहे,” असे तिच्या आईने आवर्तन पवईशी बोलताना सांगितले.
वैदिका खेळाबरोबरच शैक्षणिक कार्यात देखील तेवढीच आघाडीवर आहे. तिला शाळेतर्फे गुणवंत विद्यार्थिनीचा सन्मान देखील मिळाला असल्याचे तिच्या शाळेने सांगितले. शालेय विविध स्पर्धासोबतच तिने आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देखील भाग घेत पदके जिंकली आहेत.
“मला माझ्या पालक आणि शाळेतर्फे नेहमीच सहकार्य आणि मदत मिळत राहिली आहे. माझी बहिण मला माझ्या या खेळात नेहमीच मार्गदर्शन करते. शालेय शिक्षक मला नेहमीच प्रोत्साहन देत असतात. या सर्वांच्या पाठींब्यामुळेच मी हे सर्व करू शकत आहे.” असे आपल्या यशाबद्दल बोलताना वेदिकाने सांगितले.
No comments yet.