पवईत ‘होऊ द्या चर्चां’च्या चौक सभा

पवईच्या विविध भागात शिवसेना ‘उध्दव बाळासाहेब ठाकरे’ पक्षातर्फे ‘होऊ द्या चर्चा’ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. केंद्र व राज्य सरकारने केलेल्या योजना आणि आश्वासने कशी खोटी ठरली आहेत, या विषयी चौक सभांच्या माध्यमातून स्थानिक शिवसेना पदाधिकारी नागरिकांशी संवाद साधत आहेत. स्थानिक आमदार सुनील राऊत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शाखाप्रमुख (१२२) सचिन मदने यांच्यावतीने या कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.

या चर्चेचे पहले सत्र २ ऑक्टोबर आयआयटी येथील चैतन्यनगर चौकात पार पडले. यावेळी उप विभागप्रमुख धर्मनाथ पंत, उपविभाग संघटिका डॉ स्नेहल मांडे, शाखाप्रमुख सचिन मदने, शाखा संघटिका सुषमा आंब्रे, विधानसभा संघटक विजयंता परब, ज्येष्ठ शिवसैनिक शंकर पार्टे, कार्यालय प्रमुख विजय परब मोठ्या प्रमाणात शिवसैनिक आणि पवईकर उपस्थित होते.

यावेळी शिवसेना शाखाप्रमुख सचिन मदने आणि उपविभाग संघटिका डॉ स्नेहल मांडे यांनी जनतेशी संवाद साधत केंद्र आणि राज्य सरकार विविध आश्वासने देत आपली कशी फसवणूक करत आहे याकडे जनतेचे लक्ष वेधले.

“गेल्या नऊ वर्षाच्या काळात केंद्रातील भाजप सरकार, आणि राज्यातील भेळमिसळ सरकारने अनेक घोषणा केल्या, नागरिकांना कित्येक आश्वासने दिली आहेत. प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नसून, या योजनांच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक केली जात आहे. याची माहिती नागरिकांना ‘होऊ द्या चर्चा’ कार्यक्रमातून देत आहोत, असे याबाबत बोलताना सचिन मदने यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, “काही योजना सध्या सुरू आहेत, त्याचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थीपेक्षा अन्य मंडळी घेत आहेत. केवळ मतांच्या राजकारणासाठी दोन्ही सरकार लोकांच्या भावनेशी खेळत आहेत.”

पवईमध्ये पुढील काळात देखील अशा चौक सभा घेत सरकारची फसवी आश्वासने जनतेसमोर आणणार असल्याचे शिवसेनेच्यावतीने सांगण्यात आले.

, , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!