वर्षानुवर्षे खितपत पडलेल्या या पुलाच्या निर्मितीचे काम अवघ्या ५ महिन्यात आणि पावसाळापूर्व पूर्ण करत नागरिकांचा ज्वलंत प्रश्न मार्गी लागल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण
पवई आणि आरे कॉलनीला जोडणारा मिठीनदीवरील नवीन पूल आजपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. स्थानिक आमदार रमेश लटके यांच्या हस्ते या पुलाचे उदघाटन आज, बुधवार, २ जूनला पार पडले. यावेळी विधानसभा संघटक, उपविभागप्रमुख प्रमोद सावंत, स्थानिक नगरसेविका चंद्रावती मोरे, शाखाप्रमुख मनीष नायर उपस्थित होते. पुलाच्या लोकार्पणामुळे पवई – आरेचा मार्ग वाहतुकीसाठी मोकळा झाला असून, जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडवरील वाहतुकीचे ओझे कमी होण्यास मदत होणार आहे.
जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडच्या निर्मितीच्या आधीपासून कांदिवली, बोरीवलीकडे जाणारी आणि येणारी वाहतूक ही आरे कॉलनी मार्गे सुरु होती. जेवीएलआरच्या निर्मिती नंतर या मार्गावरील वाहतुकीचा दबाव कमी झाला असला तरी आजही मोठ्या प्रमाणात या मार्गावरून लोक प्रवास करत असतात. अशातच जयभीम नगर आणि मोरारजी नगरच्या मध्ये मिठी नदीवरील ब्रिटिशकालीन पूल हा जीर्ण झाल्याने आणि अवजड वाहतुकीमुळे धोकादायक परिस्थितीत होता. त्यातच पालिकेने २ वर्षापूर्वी तो धोकादायक म्हणून घोषित करत अवजड वाहनांसाठी बंद केला होता.
मात्र आसपासच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना पर्याय नसल्याने जीवमुठीत घेवून या पूलावरून प्रवास करावा लागत असे. त्यातच २८ नोव्हेंबरला पुलाचा कोपऱ्यातील भाग तुटल्याने हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. त्यामुळे बेस्ट बसेसची वाहतूकही बंद होती. ज्याचा परिसरातील नागरिकांना मोठा त्रास होत होता. नवीन पुलाच्या निर्मितीची मागणी घेवून स्थानिक नगरसेविका चंद्रावती मोरे, शाखाप्रमुख मनिष नायर यांच्यासह स्थानिक नागरिक यांनी लोकप्रतिनिधी आणि पालिका प्रशासनाला पत्रव्यवहार आणि पाठपुरावा केल्यानंतर महानगरपालिकेने तत्काळ हा जुना ब्रिटिशकालीन पूल पाडून डिसेंबर महिन्यात नवीन पूल बांधण्याच्या कामास सुरूवात केली होती.
पाठीमागील ५ महिन्यापासून या नवीन पूलाचे काम सुरू असल्याने स्थानिक परिसरातील नागरिकांसाठी पर्यायी तात्पुरत्या पुलाची उभारणी करून या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. अखेर या पुलाच्या एक पदरी निर्मितीचे काम पूर्ण झाले असून, वाहनांसाठी हा पूल बुधवारी खुला करण्यात आला आहे. यामुळे जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडवर येणारा वाहतुकीचा तणाव कमी होणार असून, कांदिवली, बोरीवलीकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या वाहनांना मोठी सुविधा होणार आहे.
वर्षनुवर्षे खितपत पडलेल्या या पुलाच्या निर्मितीचे काम अवघ्या ५ महिन्यात आणि पावसाळापूर्व पूर्ण करत नागरिकांचा ज्वलंत प्रश्न मार्गी लागल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
“वाहतूक बंद असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले होते. अखेर या पुलाचे निर्मितीचे काम पूर्ण झाले असून, आता हा पूल नागरिकांसाठी आणि वाहतुकीसाठी खुला करण्यात येत आहे. यामुळे नागरिकांच्या एका मोठ्या समस्येचे निराकरण झाले असून, नागरिकांना याचा फायदा होणार आहे,” असे यावेळी बोलताना आमदार रमेश लटके म्हणाले.
No comments yet.