३३ वर्षीय मालिका अभिनेता नुकताच नवीन ऑनलाईन फसवणुकीला बळी पडला आहे. कर्जाची रक्कम सेटलमेंटच्या नावाखाली सायबर चोरट्याने त्याची ८६ हजाराची फसवणूक केली. ई-वॉलेटच्या माध्यमातून शिल्लक कर्जाची माहिती मिळवत सायबर चोरट्याने हा डाव साधला. यासंदर्भात पवई पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून, पैसे हस्तांतरित झालेल्या बँकेच्या मालाड येथील शाखेतील खाते गोठवत अधिक तपास करत आहेत.
या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार अभिनेता याने नॉन बँकिंग फायनान्स कंपनीकडून (एनबीएफसी) वैयक्तिक कर्ज घेतले होते. कर्ज संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतल्यावर त्याने याच्याबद्दल जाणून घेण्यासाठी सर्च इंजिनवरून प्राप्त झालेल्या नंबरवर फायनान्स कंपनीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रतिसाद मिळाला नाही.
काही वेळाने गोपाळ नामक एका व्यक्तीने त्याच नंबरवरून फोन करून आपण फायनान्स कंपनीचा कर्मचारी असल्याचे सांगितले. कर्जाचा आयडी क्रमांक विचारून थकबाकीची बरोबर रक्कम सांगत विश्वासार्हता मिळवली. व्यक्तीने दिलेल्या निर्देशानुसार तक्रारदार अभिनेता याने कर्ज संपुष्टात आणण्यासाठी ८६ हजाराची रक्कम मालाड येथील एका खात्यात गुगल पे’च्या साहय्याने हस्तांतरित केली.
मात्र त्याची फसवणूक झाली असल्याचे लक्षात येताच त्याने फायनान्स कंपनीच्या कार्यालयाला भेट दिली असता त्याला या नवीन फसवणूकीच्या पध्दतीची माहिती मिळाली. “बीकेसी येथे सायबर पोलिस ठाण्यात याबाबत लेखी तक्रार देण्यात आली होती. नंतर हे प्रकरण पवई पोलिसात हस्तांतरित करण्यात आले असून, अज्ञात व्यक्तीविरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे,” असे याबाबत बोलताना पोलिसांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, “फसवणूक करणार्याने ई-वॉलेटमध्ये कर्जाची आयडी टाकत कर्जाचे तपशील जाणून घेतले होते. पैसे हस्तांतरित झालेल्या बँकेच्या मालाड शाखेत लॉकडाऊन दरम्यान ऑनलाईन माध्यमातून खाते उघडण्यात आले होते. बँक खाते गोठवून त्या व्यक्तीबद्दल संपूर्ण माहिती बँकेकडून मागवली आहे. त्या व्यक्तीने तक्रारदार यांना एक ओळखपत्र सुद्धा पाठवले होते, मात्र ते बनावट आहे.”
तक्रारदार याने अनेक मालिकांमध्ये काम केले असून, क्राईम पेट्रोल या मालिकेत त्याने ऑनलाईन फसवणूक प्रकरणाच्या एका भागात अभिनय केला होता आणि या माध्यमातून लोकांना ऑनलाईन फसवणुकीला बळी पडू नका असे आवाहन सुद्धा केले होते. मात्र तो स्वतः आता याचा बळी ठरला आहे.
No comments yet.