काल (२१ फेब्रुवारीला) झालेल्या पालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक १२२ जो पवईचा सर्वात मोठा भाग व्यापतो यातून मोठ्या प्रमाणात मतदारांनी घरातून बाहेर निघत मतदानाला उस्फुर्त प्रतिसाद दिला. या प्रभागातून ३१८७३ मतदारांपैकी १६७१६ मतदारांनी आपले कर्तव्य बजावल्याने ५२.४४% मतदान झाले. काही किरकोळ अपवाद वगळता पवई पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेवर नियंत्रण ठेवल्याने शांततेत मतदान पार पडले.
मुंबई महानगरपालिकेच्या २२७ जागांसाठी काल (मंगळवारी) मतदान पार पडले. ज्यातील प्रभाग क्रमांक १२०, १२१, १२२ अशा तीन प्रभागात पवई विभागली गेली आहे. १२२ या प्रभागात पवईचा सर्वात जास्त भाग येत असून या प्रभागात मतदारांनी मतदानाला उस्फुर्त प्रतिसाद देत ५२.४४% मतदान केले. प्रभाग क्रमांक १२० मध्ये ५६.८२ तर प्रभाग क्रमांक १२१ मध्ये ५८.४८% मतदान झाले.
प्रभाग क्रमांक १२२ मध्ये पवई विद्यानिकेतन, पवई इंग्लिश हायस्कूल, तिरंदाज व्हिलेज लो प्र मराठी शाळा (गोखले नगर), तिरंदाज व्हिलेज उच्च मराठी शाळा, एसएमशेट्टी शाळा या पाच केंद्रांवर ४० निवडणूक कक्षांमध्ये ही संपूर्ण मतदान प्रक्रिया पार पडली. पवई विद्यानिकेतनमध्ये ३२५४, एस एम शेट्टी शाळेत ५७१५, तिरंदाज व्हिलेज उच्च मराठी शाळेत ५८२३, तिरंदाज व्हिलेज लो प्र शाळेत ४४५ तर पवई इंग्लिश हायस्कूलमध्ये १४७९ लोकांनी मतदान केले. यावेळी पहिल्यांदाच एसएम शेट्टी शाळेत एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांनी येवून आपला मतदानाचा हक्क बजावला, ज्यामुळे यावेळी या प्रभागाचा नगरसेवक कोण बनणार याचा निर्णय सुद्धा येथूनच होणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
मतदार यादीतून नावे गायब
लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत ६ ते ७% लोकांची नावे यावेळी मतदार यादीतून गायब होती. बऱ्याच मतदारांची नावे, पत्ते चुकीची झाल्याने त्यांना मतदान करता आले नाही. अनेक मतदार चार-चार वेळा वेगवेगळ्या कक्षाच्या रांगेत उभे राहिल्यावरही त्यांना तिथे नाव नसल्याने मतदान न करताच परतावे लागले.
पवई पोलिसांचे कायदा व सुव्यवस्थेवर नियंत्रण
पवई पोलिसांनी निवडणुकीच्या आदल्या रात्रीपासूनच विविध केंद्रांचा ताबा घेत परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्याची आणि कोणताही अनुचित प्रकार घडू न देण्याची खबरदारी घेतल्याने चैतन्यनगर येथे दुपारी दोन गटात झालेली किरकोळ मारामारी वगळता शांततेत मतदान पार पडले.
मतदान केंद्रांवर ५.३० नंतरही मतदान
याद्या, मतदान केंद्र आणि नावांच्या गोंधळात अडकून पडलेल्या अनेक मतदात्यांना मतदान केंद्रांवर पोहचण्यास उशीर झाल्याने, ५.३० पर्यंत मतदान केंद्राच्या आत प्रवेश केलेल्या मतदारांना मताधिकार पावत्यांचे वाटप करून उशिरा पर्यंत मतदान करण्यात आले.
पुढील पाच वर्ष या प्रभागातून नगरसेवक म्हणून पवईचे कोण प्रतिनिधित्व करणार? हे मतपेटीत बंद झालेल्या ५२% मतदारांचा कौल उद्या निश्चित करेल.
आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा
No comments yet.