पावसाळ्यानंतर खराब झालेल्या, उखडलेल्या रस्त्यांची दुरुस्ती करून लोकांना चांगल्या रस्त्यांची सोय करून देण्याच्या कामांची सुरुवात पालिका ‘एस’ विभागाकडून सुरु झाली असून, याचा शुभारंभ जलवायू आणि म्हाडा कॉम्प्लेक्सच्यामधून असणाऱ्या रोडच्या कामाच्या सुरुवातीने झाला आहे. पुढील पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची डागडुजी केली जाणार आहे.
मुंबई आणि खराब रस्ते यांचे एक अतूट नाते आहे. पावसाळा आला की, मुंबईत ठिकठिकाणी पालिका आणि संबंधित विभागाकडून रस्ता दुरुस्तीची कामे केली जातात. ऐन मोक्यात कामे हाती पडल्याने कंत्राटदार सुद्धा कसेबसे करून दुरुस्तीचे काम संपवून मोकळा होतो. मात्र, पावसाला सुरु होताच हलक्या दर्जाच्या कामाची पोल खोल होत, संपूर्ण रस्त्यांवर खड्डे पडून पाणी साठण्यास सुरुवात होते. मग वर्षभर मुंबईकरांना उखडलेले रस्ते आणि खड्डे यातूनच प्रवास करण्याव्यतिरिक्त कोणताच पर्याय उरत नाही. म्हणूनच यावर्षी पालिकेने एक पाउल पुढे टाकत पावसाळा संपताच पालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या रस्ता दुरुस्तीच्या कामांची सुरुवात केली आहे. जेणेकरून ठेकेदारांना भरपूर वेळ मिळू शकेल आणि ते चांगला रस्ता बनवू शकतील.
पवईत सुद्धा पालिका ‘एस’ विभागातर्फे कामांना सुरुवात झाली आहे. पवईतील रस्ता दुरुस्तीच्या कामाचा शुभारंभ जलवायू आणि म्हाडा कॉम्प्लेक्सच्या मधून असणाऱ्या रोडच्या कामाने झाला आहे. याचे कंत्राट स्पेको इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला मिळाले असून, पुढील एक ते दीड महिन्यात ७ मीटर रुंद आणि २२५ मीटर लांब या रोडचे काम पूर्ण करावयाचे आहे.
या संदर्भात आवर्तन पवईशी बोलताना स्पेको इन्फ्रास्ट्रक्चरचे सुपरवायझर सुरेश धर्मावत यांनी सांगितले, “नुकतीच गेल्या आठवड्यात आम्ही या रोडच्या खोदकामाची सुरुवात केली आहे. रोडवर २ ठिकाणी डक्ट लाईन टाकून संपूर्ण रोडला खाडी आणि आवश्यक सामानाची भर टाकून रोलर फिरवून मग डांबर टाकून हा रोड बनवला जाणार आहे. संपूर्ण रोड बनवायला दीड महिना लागणार असला तरी खाडी टाकून रोलर फिरवून आम्ही स्थानिक रहिवाशांना रोड खुला करणार आहोत.”
पालिकेने उचललेल्या या पावलामुळे यावर्षी तरी पावसाळ्यात लोकांना चांगला, मजबूत रोड मिळेल अशी आशा आहे.
आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा
No comments yet.