पालिका एस विभागात दुपारी १२ नंतर अत्यावश्यक सेवेतील सर्व दुकाने बंद करून केवळ होम डिलिव्हरी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मेडिकल स्टोअरला मात्र यातून वगळण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाने ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत कडक नियम करत कोरोनाला रोखण्यासाठी कंबर कसली आहे. मात्र, नागरिक अजूनही नियमांची पायमल्ली करत अनावश्यक गर्दी करत असल्याचे प्रकार घडत आहेत. याला रोखण्यासाठी पालिका एस विभागाने कडक पाऊले उचलत अत्यावश्यक सेवेतील दुकानांच्या वेळांवर मर्यादा घातली आहे.
पालिका एस विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या पवई, भांडूप, कांजूरमार्ग, विक्रोळी या भागात अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी ८ ते दुपारी १२ या वेळेतच आवश्यक ती खबरदारी घेवून खुली ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामधून केवळ मेडिकल स्टोअर्स वगळण्यात आले आहे. शनिवार १७ एप्रिलला सहाय्यक आयुक्त पालिका एस विभाग यांच्याकडून हा आदेश काढण्यात आला आहे. १९ एप्रिल पासून ३० एप्रिल या कालावधीसाठी हा आदेश लागू राहणार आहे.
मागील काही दिवसांपासून अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी प्रशासनातर्फे वारंवार विनंती करून देखील नागरिक मोठ्या प्रमाणात बाहेर गर्दी करत असल्याचे चित्र आहे. त्यातच मुंबईमध्ये कोरोना बाधितांची संख्या देखील दिवसागणिक मोठ्या प्रमाणात वाढत आहे. बाजारात अनेक दुकाने ही चिकटून असतात. पवई परिसरात सुपरमार्केटच्या बाहेर लांबच लांब रांगा पहायला मिळत असतात. अनेकजण सकाळी, संध्याकाळी वॉकच्या नावाखाली किंवा वस्तू खरेदीचे कारण सांगत टेहाळत असतात. त्यामुळेच पालिकेने आता अत्यावश्यक दुकानांना केवळ दुपारी १२ पर्यंत चालू ठेवण्याची सूचना केली आहे. याकाळातही त्यांनी जास्तीत जास्त होम डिलिव्हरी करण्याची विनंती करण्यात आली आहे.
नियम कडक करत दुकानांच्या वेळेवर मर्यादा आली असली तरीही नागरिकांना ऑनलाईन खरेदीच्या माध्यमातून होम डिलिव्हरी करून सामान पोहचवण्याची मुभा दिली जाणार आहे.
जे कोणी दुकानदार या नियमांचे पालन करणार नाहीत त्यांचे दुकान तातडीने सीलबंद करून आपत्ती व्यवस्थापन कायदा व भा. दं. सं. नुसार कारवाई करण्यात येणार आहे. तसेच या नियमांचे पालन होण्यासाठी आणि कारवाई संबंधित पोलीस ठाण्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.
No comments yet.