कमाल आणि किमान तापमानात १४ अंशाचा फरक. सकाळी हवेत गारवा, तर सायंकाळचे वातावरण काहीसे गरम
आॅक्टोबर हिटमुळे मुंबईकर हैराण झालेले असतानाच गेल्या दोन दिवसात मुंबईच्या तापमानात घसरण नोंदविण्यात येत आहे. बुधवार सकाळच्या आकड्यांनुसार सांताक्रुझ वेधशाळेत किमान तापमान २० अंश सेल्सिअस तर कुलाबा येथे २४ अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आली. मुंबईत जाणवणारे तापमानातील फरक पवईतही अनुभवयास मिळत आहेत. पवईत बुधवारी सकाळी किमान १९.०९ तर ३४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. या नोंदीनुसार कमाल आणि किमान तापमानात तब्बल १४ अंशाचा फरक नोंदविण्यात आला आहे. गुरुवारी सकाळी सुद्धा हा गारवा कायम होता.
ऑक्टोबर महिना सुरु झाला तरी मुंबईत गारठ्या ऐवजी गर्मीचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला होता. मुंबईचा पारा सतत ३५ ते ३७ अंशांकडे नोंदवला जात होता. मात्र मंगळवार सकाळ पासून मुंबईत वातावरणात आलेल्या गारव्याने मुंबईकरांना संपूर्ण ऑक्टोबर महिन्यात जसा उन्हाचा ताप सहन करावा लागला होता, तेवढा त्रास मात्र पाठीमागील ३ दिवसात झाला नाही. तापमान ३७ अंशांपलीकडे असूनही वातावरणात गारवा आणि वाऱ्याची झुळूक अनुभवाला मिळत आहे. यापूर्वी १९५२ सालच्या ऑक्टोबर महिन्यात मुंबईत पारा १६.७ अंशांपर्यंत खाली उतरला होता.
देशभरात सध्या वाऱ्यांची दिशा बदलत आहे त्याचप्रमाणे आर्द्रताही कमी होत आहे. त्यामुळे सकाळच्या आणि संध्याकाळच्या तापमानामध्ये मोठा फरक जाणवत आहे’, अशी माहिती प्रादेशिक हवामान विभागानी माध्यमांना दिली. मात्र अजूनही उत्तर भारतात थंडीची चाहूल नसल्याने मुंबईकरांसाठी थंडी दूरच आहे. येत्या काळात कमाल तापमान आणि किमान तापमानात हा फरक कायम राहण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली.
बुधवारी सकाळी झालेल्या नोंदीनुसार पवई १९.०९, भांडूप (प.) १५.७६, घाटकोपर २४.३०, विद्याविहार २३.५८, मुलुंड (पू.) २१.२५, मुलुंड (प.) १९.९०, जोगेश्वरी २२.२२, चेंबूर २०.३८, अंधेरी (पू.) २३.२५, वांद्रे (पू.) २१.९६, वांद्रे (प.) २२.६०, सांताक्रुझ २३.६५, मालाड (प.) २३, कांदिवली (पू.) २२.४०, चारकोप २२.५७, कांदिवली (प.) २१.६४, गोरेगाव १६.६०, बोरीवली (प.) १९.०९, आकुर्ली १९.८३, वरळी १६.५४, दादर २३.५०, माझगाव २३.३३, नेरूळ २०.०५ , पनवेल १६.९० अंश सेल्सिअस असे किमान तापमान होते.
No comments yet.