परदेशी नागरिक असणारी एक ५० वर्षीय महिला पोलिसांना पवईत मृतावस्थेत मिळून आली आहे. गुरुवार, १५ जुलैला संध्याकाळी चैतन्यनगर भागात ही महिला तिच्या राहत्या घरात मृतावस्थेत पोलिसांना मिळून आली. स्थानिक रुग्णालयात किडनीच्या आजारामुळे ती डायलेसिस घेत होती. प्रथमदर्शनी तिचा मृत्यू नैसर्गिक रित्या झाला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
या संदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नायजेरियन नागरिक असणारी महिला नामे सुलुफु अरलाल आरोली लाली हिला किडनीचा आजार असल्याने ती पवईतील एका रुग्णालयात उपचार घेत होती. नियमित डायलेसिसला जावे लागत असल्याने ती चैतन्यनगर भागात भाडे तत्वावर राहत होती. “गुरुवारी आसपासच्या नागरिकांना तिच्या राहत्या घरातून दुर्गंधी येत असल्याने त्यांनी याबाबत पोलीस कंट्रोल रूमला खबर दिली.” असे याबाबत बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.
“दरवाजा उघडला असता घरात सदर महिला ही निश्चल पडलेल्या अवस्थेत मिळून आली. शरीर कुजल्याने दुर्गंधी येत होती. अग्निशमन दलाच्या मदतीने बाहेर काढत राजावाडी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. तिच्या मुलीला बोलावून आम्ही तिचा जवाब नोंदवला आहे. किमान २ ते ३ दिवसापूर्वी तिचा मृत्यू झाला असण्याची शक्यता आहे. प्रथमदर्शनी तिचा मृत्यू हा नैसर्गिक झाला असल्याचेच समोर येत आहे,” असेही याबाबत बोलताना पोलीस म्हणाले.
यासंदर्भात पवई पोलीस अधिक तपास करत आहेत.
No comments yet.