दारू पिताना दोघांच्यात झालेल्या किरकोळ वादात एका मित्राने आपल्या दुसऱ्या मित्राचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना शुक्रवारी संध्याकाळी पवई परिसरात घडली. गणेश प्रधान (२८) असे खून करण्यात आलेल्या इसमाचे नाव असून, शनिवारी पवई पोलिसांनी त्याचा मित्र संदेश धिंग्रा याला गुन्ह्यात अटक केली आहे.
या संदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या मरोळजवळील पाईपलाईन भागात एक तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती पवई पोलिसांना प्राप्त झाली होती. त्याला राजावाडी येथे दाखल केले असता त्याच्या डोक्याला जबर जखम झाल्याने, मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
‘दगडाने ठेचून तरुणाची ओळख मिटवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र त्याच्याजवळ मिळालेल्या आधार कार्डवरून त्याची ओळख पटली होती. घटनास्थळी आम्हाला दोन ग्लास, दारूची बॉटल आणि इत्तर काही साहित्य मिळून आले होते, ज्यावरून गणेशसोबत अजून कोणीतरी त्या निर्जनस्थळी दारू पिण्यासाठी आले होते हे स्पष्ट झाले.’ असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले.
काही प्रत्यक्षदर्शिनी गणेशसोबत त्याचा मित्र संदेश सुद्धा दारू पिण्यासाठी तेथे बसला असल्याची माहिती पवई पोलिसांना दिली होती. संदेशाला एमआयडीसी येथील त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यानेच आपल्या मित्राचा खून केल्याची कबुली दिली.
‘दारूच्या नशेत दोघांच्यात झालेल्या भांडणातून संदेशने आपल्या मित्राचा खून केला असल्याची कबुली दिली आहे. संदेशवर पोलीस ठाण्यात इतरही काही गुन्ह्यांची नोंद आहे,’ असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पोफळे यांनी सांगितले.
भादंवि कलम ३०२ नुसार गुन्हा नोंद करून पवई पोलिसांनी संदेश धिंग्रा याला अटक केली असून, त्याला आज न्यायालयात हजर केले जाईल.
No comments yet.