जवळपास १.५ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर पुनर्निर्मितीच्या कामांतर्गत सिमेंटीकरण करून डी पी रोड ९ची रामबागकडून चांदिवलीकडे येणारी वाहिनी वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे. मात्र या वाहिनीवर कब्जा करत मोठ्या प्रमाणात वाहने पार्क केली जात असल्याने आणि संपूर्ण मार्गावर ठिकठिकाणी कचरा फेकला जात असल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी वापरात न येता पार्किंग झोन आणि कचरा संकलन केंद्र बनला आहे.
तसेच हा रस्ता बनवताना ठेकेदाराने घाईगडबडीत निकृष्ट काम करत हा रस्ता बनवला असून, तो समाधानकारक नसल्याची स्थानिकांची तक्रार आहे.
डी पी रोड ९ हा चांदिवलीला जेविएलआरशी जोडणारा एकमेव प्रमुख रस्ता आहे. मात्र या रस्त्याच्या दुरावस्थे बाबतच्या नागरिकांच्या वारंवार तक्रारीनंतर पालिकेतर्फे डिसेंबर २०२२ मध्ये टेंडर काढत रस्त्याच्या पुनर्निर्मितीचे कंत्राट देण्यात आले होते. जवळपास १.५ वर्ष गटाराच्या कामात अडकून पडलेला या रस्त्याच्या रामबागकडून चांदिवलीकडे येणाऱ्या मार्गीकेचे पावसाळ्याच्या दृष्टीने घाईगडबडीत सिमेंटीकरण पूर्ण करून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.
“हा रस्ता खुला करण्यात आल्यानंतर वाहतूक कोंडीतून सुटका होऊन एका चांगल्या मार्गावरून प्रवास करायला मिळेल अशी आशा होती. मात्र या रस्त्यावर कॅलिप हॉटेल ते स्टेट बँक ऑफ इंडिया समोरील भागापर्यंत संपूर्ण रस्त्यावर टेम्पो, कार, रिक्षा, मोटारसायकल अशी सर्वच वाहने पार्क करून ठेवलेली असतात. त्यामुळे नाईलाजास्तव रामबागकडे जाणाऱ्या वाहिनीवरील खड्डामय रस्त्यावरूनच दोन्ही दिशेच्या वाहनांना प्रवास करावा लागत आहे. मग हा रस्ता नक्की बनवला कशासाठी आहे आणि त्याचा उपयोग काय? असा प्रश्न निर्माण होत आहे,” असे आवर्तन पवईशी बोलताना चांदिवलीकराने सांगितले.
यासंदर्भात बोलताना चांदिवली सिटीझन वेल्फेअर असोसिएशनचे संस्थापक सदस्य मनदीप सिंग म्हणाले, “अर्धवट बांधलेला रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. ठेकेदाराने निकृष्ट काम केले असून, डीपी रोड ९ची सध्याची स्थिती अपघातास कारणीभूत ठरणारी आहे. त्यातच या नवनिर्मित वाहिनीवर कचरा टाकणे, बेकायदा पार्किंग सुरू आहे त्यामुळे नागरिकांनी या मार्गाचा वापर काळजीपूर्वक करावा.”
ये पुढे म्हणाले, “रस्त्याच्या ५५७ मीटर लांबीच्या काँक्रिटीकरणाची वर्क ऑर्डर फेब्रुवारी २०२३मध्ये जारी करण्यात आली होती. या महत्त्वाच्या कनेक्टर रस्त्याचे काम फेब्रुवारी २०२४ पर्यंत सहज पूर्ण होऊ शकले असते, मात्र ठेकेदाराने १५ महिन्यांत रस्त्याच्या केवळ एका बाजूचे काँक्रिटीकरण केले आहे. ठेकेदार गोगलगायीच्या गतीने काम करत आहे, कंत्राटदाराने वर्षभर गोगलगायीच्या गतीने काम केले, नंतर घाईघाईने महिनाभरात रस्ता पूर्ण केला, परिणामी काम निकृष्ट झाले आहे. रस्ता जेमतेम वाहन चालविण्यायोग्य असून, जीव धोक्यात घालणारा बनला आहे. पालिका आणि ठेकेदाराने करदात्यांच्या पैशाची पूर्णपणे नासाडी केल्याचे स्पष्ट दिसत आहे.”
या संदर्भात खासदार वर्षा गायकवाड यांनी दखल घेतली आहे. गुरुवार, २० जूनला पालिका उप आयुक्त (झोन-५) देविदास क्षीरसागर आणि सहाय्यक आयुक्त (एल विभाग) धनाजी हेर्लेकर यांच्या भेटीदरम्यान चांदिवली व पवई येथील नागरिकांनी रस्त्याच्या निकृष्ट कामाबाबत वारंवार तक्रारी करूनही पालिकेने या समस्येकडे सोयीस्करपणे डोळेझाक केल्याबद्दल उदासीनता व्यक्त करत त्यांनी या संदर्भात त्वरित हस्तक्षेप करण्याची मागणी केली.
No comments yet.