प्रभाग क्रमांक १२२ मधून निवडून आलेल्या पवईच्या नवनिर्वाचित नगरसेविका सौ.वैशाली श्रीकांत पाटील यांच्या हस्ते बुधवारी हरिओमनगर येथे त्यांच्या कार्यकाळातील विकासाच्या कामाचा पहिला नारळ फोडला गेला. यावेळी येथील माजी नगरसेवक चंदन शर्मा सह परिसरातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती. माजी नगरसेवक चंदन शर्मा यांच्या निधीतून मलनिसारण वाहिनी बनवण्याचे काम येथे केले जात आहे.
२०१७ ते २०२२ या पाच वर्षासाठीच्या पालिका सार्वत्रिक निवडणूका नुकत्याच पार पडल्या. निवडणुकांच्या या रणधुमाळीत आचारसंहिता लागू असल्याने अगदी शेवटी शेवटी फंड, मंजूरी मिळून अनेक विकासकामे लटकली होती. आचारसंहिता संपताच अडकलेल्या या कामांना परत सुरुवात झाली आहे.
माजी नगरसेवक शर्मा यांच्या नगरसेवक निधीतून काही विकास कामांना शेवटच्या काळात मंजुऱ्या मिळून कामे अडकून पडली होती. असेच एक अडकून पडलेल्या हरिओमनगर येथील मलनिसारण वाहिनी टाकण्याच्या कामाचा शुभारंभाचा नारळ पाटील यांच्या हस्ते फोडण्यात आला.
राजकारण पेटले
या उदघाटनाच्या कार्यक्रमानंतर काही उस्फुर्त कार्यकर्त्यांनी सोशल साईटवर नवनिर्वाचित नगरसेविकांच्या हस्ते कामाच्या शुभारंभाचे फोटो टाकत “मा. नगरसेवक चंदन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील पाच वर्ष विकासाची कामे करण्याचे ठरविले आहे” असा संदेश टाकल्याने भाजपा कार्यकर्ते नाराज झाल्याचे चित्र होते. दिवसभर पवईकरांमध्ये राजकीय चर्चांना ऊत आले होते. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमकी सुद्धा उडाल्या, मात्र जेष्ठानी मध्यस्थी केल्याने रात्री उशिरा वातावरण निवळले.
याबाबत बोलताना भाजपाचे जेष्ठ पदाधिकारी राघव पै यांनी सांगितले, “आम्हाला कार्यक्रमासाठी आमंत्रित केले गेले होते म्हणून आम्ही तिथे गेलो होतो. असे फोटो आणि संदेश टाकून लोकांच्यात संभ्रम निर्माण करणे योग्य ठरत नाही”
राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा नंबर बंद येत असल्याने संपर्क होऊ शकला नाही.
आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा
No comments yet.