पवई तलावात (Powai Lake) वाढलेल्या जलपर्णीमुळे (water hyacinth) तलावातील मासे आणि जैव विविधतते सोबतच तलावाच्या सौंदर्याला धोका निर्माण झाला आहे. यासंदर्भात स्थानिक नागरिक आणि विविध स्वयंसेवी संस्था यांच्याकडून पालिकेला तक्रार केल्या जात असतात. यासंदर्भात दखल घेत मुंबई महानगरपालिकेने (मनपा) या जलपर्णी आणि तलावातील टाकाऊ पदार्थ काढण्याची तयारी केली आहे.
हार्वेस्टर यंत्र व एमफीबियस यंत्राच्या साहाय्याने तलावातील जलपर्णी काढण्याचे काम करण्यात येणार असून, त्यासाठी सव्वा अकरा कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. एस.के. डेव्हलपर्स नामक कंत्राटदाराची यासाठी नियुक्ती करण्यात आली असून, काम सुरु केल्यापासून सहा महिन्याच्या कालावधीत काम पूर्ण करणे अपेक्षित आहे.
पवई तलाव हे मुंबईतील मुख्य पर्यटन स्थळांपैकी एक आहे. मुंबईकरांचा या ठिकाणी असणारा ओढा पाहता करोडो रुपये खर्च करून तलाव परिसरात सुशोभिकरण करण्यात आले आहे. ठिकठिकाणी मुलांना खेळण्याची ठिकाणे, बसण्याच्या जागा, पदपथ, चालण्यासाठी, बसण्यासाठी ठिकाणे, सुंदर आकर्षक रोषणाई अशा विविध सुविधा करत तलावाचा परिसर अत्यंत सुंदर करण्यात आला आहे. यामुळे येथे येणाऱ्या मुंबईकरांची संख्या आणखी वाढली होती. मात्र काही काळातच पवई तलावात सोडले जाणारे सांडपाणी, टाकला जाणारा कचरा यामुळे दुर्गंधी आणि जलपर्णी वाढल्याने मुंबईकरांनी याकडे पाठ फिरवायला सुरुवात केली आहे.
जलपर्णीच्या वाढीमुळे पाण्याचा पुष्ठभाग झाकून गेल्याने तलावातील जैवविविधततेपर्यंत सूर्यप्रकाश पोहोचण्यास अडथळा निर्माण होतो. तलावाच्या पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊन तापमानात फरक पडतो. तसेच माशांचे खाद्य असणाऱ्या वनस्पतींची वाढ खुंटते. यामुळे तलावातील जैवविविधततेला धोका निर्माण झाला आहे.
तलावाची होत चाललेली दुरावस्था आणि वाढत्या जलपर्णी याबाबत अनेक संस्था आणि नागरिकांनी पालिकेकडे तक्रारी केल्या आहेत. यामुळे तलावाचे सौंदर्य बाधित झाले असून पालिकेने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली गेली होती. याचीच दखल घेत तलावाचे सौंदर्य अबाधित राखण्यासाठी तसेच तलावातील जैव विविधतता जतन करण्यासोबतच याचे संवर्धन करण्यासाठी सफाई मोहीम हाती घेतली आहे.
एस. के. डेव्हलपर्स या कंपनीला या कामासाठी नियुक्त करण्यात आले असून, यंत्रांच्या साहाय्याने जलपर्णी तसेच तलावातील टाकाऊ पदार्थ बाहेर काढल्यानंतर त्यांची डम्पिंग ग्राउंडवर योग्य विल्हेवाट लावण्याची जबाबदारी त्यांची असणार आहे. यासाठी ११ कोटी १८ लाख एवढी रक्कम खर्च करण्यात येणार आहे. जलपर्णी काढण्याचे काम सहा महिन्यात पूर्ण करून त्यानंतर पुढील १८ महिने तलावाची देखभालही करायची आहे.
No comments yet.