मानसिक त्रासाला कंटाळून पवईतील दोन तरुणांनी आत्महत्या केल्याच्या घटना पाठीमागील दोन दिवसात घडल्या आहेत. पवईतील कॉस्मोपॉलिटिन इमारतीत राहणारा संकेत तांबे याने सोमवारी राहत्या इमारतीच्या ८ मजल्यावरील रीफ्युजी एरियातून उडी मारून आत्महत्या केली. तर फिल्टरपाडा येथे राहणारा तरुण ओम बाली (१८) याने कांजुरमार्ग येथे लोकलखाली आत्महत्या केली.
पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संकेत हा हुशार विद्यार्थी होता. विधी शाखेत पदवी मिळवल्यानंतर गुन्हे, गुन्हेगार प्रवृत्ती, गुन्हेगार याबाबत सतत अभ्यासू असणारा संकेत नियमित पोलिसांच्या संपर्कात राहत असे. ‘पाठीमागील आठवड्यातच त्याने सनद मिळाल्याचे पेढे पोलीस ठाण्यात वाटले होते.’ असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
काही दिवसांपासून तो नैराश्यातून जात असल्याचे जाणवत होते. त्याच्या सोबत असणाऱ्या अनेक मित्रांना त्याच्यातील बदल जाणवत होता, मात्र कोणालाच त्याने स्पष्ट काही सांगितले नव्हते. ‘सोमवारी, १० डिसेंबरला कॉस्मोपॉलिटिन इमारत क्रमांक ९ येथील सुरक्षा रक्षकाला काहीतरी पडल्याच्या आवाज आला म्हणून पाहिले असता संकेत रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळून आले’ असेही याबाबत बोलताना अधिकाऱ्याने सांगितले.
आत्महत्येचे नक्की कारण समोर आले नसले तरी त्याची सुसाईड नोट पोलिसांना मिळून आली आहे. सुसाईड नोटनुसार शैक्षणिक कारणाने तो त्रस्त असल्याचा उल्लेख त्याने त्यात केला असून, पोलीस त्याच्या आधारावर अधिक तपास करत आहेत.
दुसऱ्या घटनेत पवईतील फिल्टरपाडा, फुलेनगर येथे राहणाऱ्या ओम बाली (१८) या तरुणाने ९ डिसेंबरला कांजुरमार्ग येथे लोकल खाली आत्महत्या केली. मानसिक तणावातून त्याने ही आत्महत्या केली असल्याचे समोर येत आहे.
No comments yet.