महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) भरती मोहिमेदरम्यान आपल्या मित्राच्या जागी लेखी परीक्षेला बसल्याच्या आरोपावरून पवई पोलिसांनी मंगळवारी एका २३ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. डमी उमेदवार म्हणून काम करणाऱ्या गणेश सतवनला चेतन बेलदार याने लेखी परीक्षेत प्रतिनिधित्व करण्यासाठी मोठ्या रकमेचे आश्वासन दिले होते, असे पोलिसांनी सांगितले.
म्हाडाने ५६५ पदे भरण्यासाठी भरती मोहीम सुरू केली आहे. यासाठी मंगळवारी पवईच्या ओरम आय-टी पार्कमध्ये लेखी परीक्षेचे नियोजन केले होते. परीक्षा सुरु असताना येथील पर्यवेक्षकांना शंका आल्याने त्यांनी याबाबत कागदपत्रे तपासून पाहिली असता फोटो आणि कागदपत्रात तफावत आढळून आली.
“परीक्षा हॉल तिकीट, ड्रायव्हिंग लायसन्स आणि आधार कार्ड जप्त केले जे बेलदारचे होते, पण फोटो सतवनशी जुळत नव्हते. याबाबत ओरम आयटी पार्क केंद्राचे प्रमुख साहिल नदाफ यांनी तक्रारदार संजयकुमार राठोड जे म्हाडात उपअभियंता म्हणून काम करतात त्यांना फोन केला आणि त्यांनी बेलदारच्या बदली परीक्षेला बसण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीला पकडले असल्याची माहिती दिली.” असे यासंदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
तक्रारदार संजयकुमार राठोड यांनी दिलेल्या तक्रारीवरून पवई पोलिसांनी भादवि कलम ४१९ (तोतयागिरी करून फसवणूक) आणि ३४ (सामान्य हेतू) आणि महाराष्ट्र विद्यापीठ, बोर्ड आणि इतर विशिष्ट परीक्षा कायदा, १९८२ मधील गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून सतवनला अटक करण्यात आली आहे.
“अटक आरोपीकडून पर्यवेक्षकांना एक चिपकार्ड आणि ईअरफोन मिळून आला आहे. या दोन्हीचा उपयोग करून तो कॉपी करत असल्याचे समोर येत आहे,” असे पोलीस म्हणाले.
यासंदर्भात पुणे पोलिसांच्या सायबर विभागाच्या एका पथकाने पवई पोलीस ठाण्यात येत गुन्ह्याची माहिती घेतली. पुणेमध्ये सुद्धा अशाच प्रकारे गुन्हे घडले असून, त्यात यातील आरोपींचा काही सहभाग आहे का याबाबत पोलीस तपास करत आहेत.
No comments yet.