पवई येथील एका ६ वर्षीय व्यक्तीला आपल्या पुतण्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करायचे होते. यासाठी रुग्णालयाचा फोन नंबर गुगलवर सर्च करणे या पवई कराला चांगलेच महागात पडले आहे. डॉक्टरांना भेटायचे असल्यांस नोंदणी आवश्यक असल्याचे सांगत सायबर चोरट्याने कस्टमर सपोर्ट अँपची लिंक देत असल्याचा बहाणा करून सदर इसमाच्या मोबाईलचा ताबा घेत ४. ८८ लाखाची रक्कम लांबवली.
पवई परिसरात राहणारे एस आर विश्वकर्मा यांना पुतण्या आजारी असल्याने त्याला डॉक्टरकडे घेऊन जायचे होते. हे डॉक्टर मुंबईतील कूपर रुग्णालयात भेटत असल्याने विश्वकर्मा यांनी सदर रुग्णालयाचा नंबर गुगल सर्च इंजिनवरून मिळवला. या क्रमांकावर संपर्क केला असता समोरील व्यक्तीने तो रुग्णालयाचा प्रतिनिधी असल्याचे भासवत डॉक्टरांना भेटण्यासाठी ऑनलाइन नोंदणी करावी लागते असे सांगत नोंदणीसाठी एक लिंक पाठवली. या लिंकवरून रुग्णालयाचा कस्टमर सपोर्ट ॲप डाउनलोड करून त्यावर तपशील भरून नोंदणी करा, असे त्याने सांगितले.
विश्वकर्मा यांनी ॲप डाउनलोड करताच समोरील व्यक्तीला त्यांच्या संपूर्ण मोबाईलचा ताबा मिळाला होता. याच्याच आधारे २१ मे ते २३ मे दरम्यान सायबर चोरट्याने विविध व्यवहारांच्या माध्यमातून विश्वकर्मा यांच्या खात्यातून ४.८८ लाख त्यांच्या नकळत गायब केले.
विश्वकर्मा यांनी आपल्या व्यवसायाच्या संदर्भात दोन लाखांचा चेक एका व्यावसायिकाला दिला होता, मात्र हा चेक पुरेशी रक्कम नसल्याने बाउन्स झाला. याबाबत विश्वकर्मा यांनी आपल्या बँकेत जाऊन चौकशी केली असता त्यांच्या खात्यामधून आठ ते दहा व्यवहार करून सुमारे पाच लाख रुपये इतर खात्यांमध्ये वळविण्यात आल्याचे त्यांना सांगण्यात आले.
आपल्या खात्यातून एवढी मोठी रक्कम काहीच न कळता गायब झाली असल्याने त्यांनी डाऊनलोड केलेल्या कस्टमर सपोर्ट ॲपमुळेच हे घडल्याचे लक्षात येताच त्यांनी त्वरित ॲप डिलीट करत पवई पोलीस ठाण्यात याबाबत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
“व्यवहारासाठी वापरलेले मोबाईल क्रमांक, बँक खाती आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आम्ही आरोपीचा शोध घेत आहोत,” असे पवई पोलिसांनी सांगितले.
No comments yet.