पवईतील कॉर्पोरेट कार्यालयात काम करणाऱ्या व्यक्तीशी विवाह जुळवणाऱ्या साईटवर बनावट प्रोफाइलद्वारे मैत्री करून, वडिलांच्या वैद्यकीय उपचारांसाठी पैसे देण्याच्या प्रत्याशावर एका महिलेने २३.४४ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. पवई पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार नोंदविण्यात आली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.
पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ वर्षीय तक्रारदाराने गेल्या वर्षी लग्न जुळवणाऱ्या साईटवर एका महिलेच्या प्रोफाइला विनंती पाठविली होती. ती स्वीकारल्यानंतर दोघांच्यात बोलणे सुरु झाले. पुढे महिलेने तिचा मोबाईल नंबर सुद्धा शेअर केला आणि दोघांच्यात एसएमएस आणि कॉलवर बोलणे सुरु झाले. त्यानंतर तक्रारदाराने त्या महिलेला भेटण्याची विनंती केली, परंतु ती टाळाटाळ करत असे.
‘महिलेने तिच्या वाढदिवसाच्या दिवशी भेटण्याची तयारी दर्शवत, गिफ्ट म्हणून आयफोनची मागणी केली. भेटण्याच्या दिवशीच आपल्या वडिलांना रुग्णालयात दाखल केले असल्याचे सांगत महिलेने पैशांच्या मदतीची मागणी केली. लंडनमध्ये काम करणाऱ्या भावाने पैसे पाठवले कि लगेच परत करण्याचे आश्वासनही दिले’ असे याबाबत बोलताना एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
महिलेने आई, बहिणी आणि वडिलांना सुद्धा तक्रारदाराशी फोनवर बोलण्यास दिल्यामुळे त्याचा विश्वास बसला. ज्यानंतर त्याने ऑनलाईन पैसे ट्रान्स्फर केले. एक वेळ पैसे घेण्यासाठी ड्रायव्हरच्या रूपात एक माणूस पाठवण्यात आला. तिच्या आयफोनच्या किमतीसह २३.४४ लाख रुपये त्याने दिले होते.
तक्रारदाराने पुन्हा महिलेला भेटायचा आग्रह केला, मात्र तिने टाळाटाळ सुरुच ठेवली. एप्रिल महिन्यात तक्रार दाखल करण्याची धमकी दिल्यानंतर महिला पवईमध्ये तक्रारदाराला भेटली. तिच्या “सुंदर” ऑनलाइन प्रोफाइल पेक्षा पूर्णपणे वेगळी असल्याचे पाहून तो आश्चर्यचकित झाला.
‘तिच्या वडिलांच्या उपचारांसाठी पैसे देणाऱ्या कोणाला तरी आकर्षित करायचे म्हणून तिने नकली फोटो अपलोड केल्याचे तक्रारदाराला कबूल केले. तिने तक्रारदारास पोलिसांकडे न-जाण्याची विनंती केली आणि लवकरच ती पैसे परत करेल असे सांगितले. मात्र तक्रारदाराने तिला मागच्या आठवड्यात पैशांची मागणी केली तेव्हा तिने उद्धटपणाने बोलत तक्रारदाराच्या विरोधातच गुन्हा दाखल करण्याची धमकी धमकी दिली. ज्यानंतर त्याने पवई पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला.
No comments yet.