पवईतील ८४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाशी परदेशी नागरिक असल्याचे भासवत सोशल माध्यमात बनावट खाते बनवून, मैत्री करून नंतर मोबाईलवर संपर्क साधत भारतातील गरीब कोविड रुग्णांना मदत म्हणून पैसे पाठवण्याच्या बहाण्याने २०.४७ लाखाची फसवणूक करणाऱ्या ३ आरोपींना पवई पोलिसांनी शनिवारी नोएडा, उत्तरप्रदेश येथून बेड्या ठोकल्या आहेत.
राहुल विनोद तिवारी (वय २१ वर्ष), आसिम समशाद हुसेन (वय २३ वर्ष), आसिफ वसिम खान (वय २१ वर्ष) अशी अटक आरोपींची नावे आहेत. सदर आरोपींचे नोएडा येथून ट्रान्झीट रिमांड घेवून अंधेरी येथील न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने त्यांना १ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पवई पोलीस मुख्य आरोपीचा शोध घेत आहेत.
पवईत राहणारे ८४ वर्षीय सुब्रम्हण्यम रामण यांना २८ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत सोशल मीडिया आणि मोबाईलवर फोन करून वेतन मेगन नावाच्या महिलेने संपर्क साधला. आपण लंडन येथून बोलत असून, भारतातील गरीब कोविड रुग्णांना मदत करावयाची असल्याचे तिने त्यांना सांगितले. “तिने मला १,३०,००० पौंड (भारतीय मुल्य रूपये एक करोड चाळीस लाख रूपये) पाठवित असून, ते पैसे तुम्ही भारतातील गरीब कोव्हीड पेशंटला मदत म्हणून द्या” असे सांगितले.
यानंतर बिजोय कमन नामक एका महिलेने व अनोळखी इसमांनी कस्टम क्लिअरन्स व इन्कमटॅक्सच्या नावाखाली रामण यांना संपर्क साधत विविध खात्यामध्ये एकूण रूपये २०,४७,८१० भरण्यास सांगितले. कस्टम क्लिअरन्स व इन्कमटॅक्स रक्कम भरूनही पैसे मिळाले नसल्याने आणि वारंवार होणारी पैशांची मागणी पाहता आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात येताच रामण यांनी पवई पोलीस ठाण्यात धाव घेत फसवणुकीचा गुन्हा नोंद केला होता.
पवई पोलीस भादवि कलम ४२० (फसवणूक), ३४ (सारख्याच उद्देशाने एकापेक्षा अधिक व्यक्तीचा समावेश) सह माहिती तंत्रज्ञान कायदा ६६ (क), (ड) अन्वये गुन्हा नोंद करून तपास करत होते. “सदर गुन्ह्याच्या तपासा दरम्यान फिर्यादी यांनी पाठवलेल्या रक्कमेपैकी रू. ३,४४,००० रुपये हे राहुल तिवारी नामक इसमाच्या नोएडा सेक्टर ६३ येथील कॅनरा बँकेच्या खात्यात जमा झाल्याचे समोर आले होते. सदर खाते उघडताना वापरण्यात आलेल्या मोबाईलच्या तांत्रिक विश्लेषणावरून नमुद गुन्ह्यातील संशयित इसम हे नोएडा येथे असल्याचे निष्पन्न झाले होते,” असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबुराव सोनावणे यांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीच्या आधारावर गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सपोनि विनोद पाटील व गुन्हे प्रकटीकरण पथक यांना त्वरित नोएडा येथे रवाना करण्यात आले होते.
“राहुल तिवारी यास तांत्रिक माहितीच्या आधारावर ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे चौकशी दरम्यान त्याने इसम नामे आसिम समशाद हुसेन याच्या सांगण्यावरून एचडीएफसी बैंक, कॅनरा बैंक, आयसीआयसीआय बैंक, एसबीआय बँक, इंडीयन बँक, युनिअन बँक, इंडीयन ओव्हरसीस बैंक अशा एकूण ७ बँकामध्ये खाते उघडले असून, त्याबदल्यात त्यास ४० हजार रुपये देण्यात आले होते,” असे यासंदर्भात बोलताना पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण हारुगडे म्हणाले.
सदर खात्याचे सर्व एटीएम, पासबुक, चेकबुक व खात्यास संलग्न असलेला मोबाईलचे सिम हे राहुल तिवारी याने आसिम हुसेन यास दिले होते. “असीम हुसेन याला ताब्यात घेवून चौकशी केली असता सदर किट त्याने आसिफ वसिम खान यास दिल्याचे सांगितले. तांत्रिक तपास करून असिफ खान याला नोएडा, सेक्टर ६३ येथून ताब्यात घेण्यात आले. त्याच्या राहत्या घरातून विविध बँकांचे एकूण १६ एटीएम. कार्ड, १६ पासबुक, ०६ चेकबुक, ०२ आधार कार्ड तसेच गुन्ह्यात वापरलेले ४ मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत.” असे याबाबत बोलताना सपोनि विनोद पाटील यांनी सांगितले.
गुन्ह्याची कार्यपध्दती
“आसिम हुसेन हा वेगवेगळ्या इसमांचे वेगवेगळ्या बँकेत खाते उघडून सदर खात्याचे सर्व किट व बँकेला संलग्न असलेला मोबाईल क्रमांक खातेधारकाकडून विशिष्ट रक्कम देऊन विकत घेतो. सदर सर्व किट आसिफ खान यास देतो. असिफ हा नमुद किटमधील एटीएम कार्डचा वापर करून खात्यात जमा झालेली रक्कम काढून ती मुख्य आरोपीकडे देत असतो.” असे याबाबत बोलताना पोलिसांनी सांगितले.
सदरची उत्कृष्ठ कामगिरी पोलीस उप आयुक्त परिमंडळ – १० डॉ. महेश्वर रेड्डी, सहाय्यक पोलीस आयुक्त साकीनाका विभाग मुकुंद पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पवई पोलीस ठाणे आबुराव सोनावणे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण हारुगडे, सपोनि विनोद पाटील, पो.ह. संतोष देसाई, पो.ना. बाबू येडगे, पो.ना नितीन खैरमोडे, पो.ना. ब्रिजेश पवार, पो.ना. सचिन गलांडे, पो.ना. अभिजीत जाधव, पो.शि. अंबादास चौगुले, पो.शि. प्रशांत धुरी यांनी केली आहे.
No comments yet.