डेटिंग ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तरुणांशी मैत्री करून त्यांना लुटणाऱ्या टोळीतील ३ जणांना पवई पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही टोळी डेटिंग ॲपच्या माध्यमातून तरुणांशी गप्पा मारायची, त्यांना निर्जनस्थळी बोलावून लुटायची.
निलेश राजेंद्र साळवे (२८), राहुल सिंग तिरवा (२१) आणि साहिल सोनवणे (२०) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सर्व अटक आरोपी हे आयआयटी मार्केट भागातील परिसरात राहतात. या टोळीत अजूनही काही लोकांचा सहभाग असून, त्यांच्या इतर साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.
यासंदर्भात बोलताना पवई पोलिसांनी सांगितले की, एका डेटिंग ॲपच्या माध्यमातून मैत्री करून २६ सप्टेंबरला रमाबाई आंबेडकर नगर, पवई येथे बोलावून निर्जनस्थळी घेवून जात काही तरुणांनी लुटल्याची तक्रार एका तरुणाने पवई पोलीस ठाण्यात केली होती. तरुणाकडील चांदीची चैन आणि १० हजार रुपये रोख रक्कम या तरुणांनी जबरी चोरी केले होते.
हे प्रकरण गंभीर असल्याने तांत्रिक माहिती आणि खबऱ्यांचे जाळे कार्यरत करत पोलीस या टोळीचा शोध घेत होते. “तपासाच्या दरम्यान २० ते बावीस वर्षाचे काही तरुण यात सहभागी असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली होती. त्या अनुषंगाने सापळा रचून आम्ही आयआयटी मार्केट भागात राहणाऱ्या साहिल सोनावणे आणि राहुल तीरवा याला ताब्यात घेवून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली,” असे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी संतोष कांबळे यांनी सांगितले.
पवई परिसरात याच प्रकारच्या आणखी काही घटना घडल्या असून, त्याबाबत पोलीस ठाण्यात तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. अटक दोन आरोपींच्या सखोल चौकशीत आणि तांत्रिक तपासात या टोळीमध्ये निलेश साळवे या तरुणाचा सहभाग देखील निष्पन्न होताच त्याला देखील पवई पोलिसांनी अटक केली आहे.
मोडस ऑपरेंडी –
“अटक करण्यात आलेल्या तरुणांचे मोबाईल तपासले असता, पोलिसांना त्यात डेटिंग ॲप मिळून आले. या डेटिंग ॲपच्या माध्यमातून हे तरुण गप्पा मारून विश्वास संपादन करून शक्यतो रात्रीच्या वेळी तरुणांना भेटण्यासाठी निर्जनस्थळी बोलावत. त्या ठिकाणी टोळीतील तरुण लपून दबा धरून बसलेले असत. सावज तरुण तिथे पोहचताच त्याला घेरून त्याला धमकावून त्याच्याकडील मौल्यवान वस्तू आणि रोकड घेवून ही टोळी पसार होत”, असे यासंदर्भात बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.
अटक सर्व तरुण हे केवळ तरुणांना लुटण्याच्या उद्देशानेच या डेटिंग ॲपचा उपयोग करत होते. “या टोळीत अजूनही काही तरुणांचा सहभाग असण्याची शक्यता आहे. त्यांच्या इतर साथीदारांचा आम्ही शोध घेत आहोत,” असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक (पवई पोलीस) जितेंद्र सोनावणे यांनी आवर्तन पवईशी बोलताना सांगितले.
No comments yet.