महिलेचा खून करून, खाडीत फेकून पुरावा नष्ट करणाऱ्या दोघांना पवई पोलिसांनी केली अटक

महिलेचा खून करून, खाडीत फेकून पुरावा नष्ट करणाऱ्या दोघांना पवई पोलिसांनी केली अटक

पवई पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथक अटक आरोपींसह

पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक महिला बेपत्ता झाल्याची तक्रार ऑगस्ट २०१९ रोजी दाखल झाली होती. याचा तपास सुरु असताना ८ महिन्यानंतर ही महिला हरवली नसून, महिलेचा खून झाला असल्याचे समोर येताच, पवई पोलिसांनी तिचा पूर्व पती आणि त्याच्या एका साथीदाराला अटक केली आहे.

निसार सिकुर शेख (३२) आणि धुवचंद्र उर्फ लल्लन तिवारी (३४) अशी अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींची नावे आहेत. यातील मुख्य आरोपी निसार हा कंत्राटदार असून, त्याचा मित्र लल्लन हा ड्रायव्हर म्हणून काम करतो.


महिला नामे दिपाली रामनारायण यादव (३०) दिनांक २४ जुलै २०१९ पासून आयआयटी पवई येथून हरवल्याची तक्रार तिच्या बहिणीने ११ ऑगस्ट २०१९ रोजी पवई पोलिस ठाण्यात नोंद केली होती. या संदर्भात पवई पोलिस दिपाली हिचा शोध घेत होते. मुंबई आणि ठाणे परिसरातील सर्व पोलिस ठाण्यात तिचा फोटो आणि वर्णन पाठवून माहिती मागवण्यात आली होती.

“मृत महिला कॉल सेंटरमध्ये काम करत होती. तिचा निसार खान नामक व्यक्तीसोबत विवाह झाला होता, मात्र दोघे जास्त काळ एकत्रित राहू शकले नाहीत आणि काही वर्षातच दोघे वेगळे झाले. यानंतर निसार याचा दुसरा विवाह झाला आहे,” असे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी तिचा पूर्व पती निसार आणि मित्रमंडळी यांच्याकडे चौकशी केली असता तिच्या हरवण्याचे कारण समोर येवू शकले नव्हते. “आमचा तपास सुरु असताना चौकशीत या महिलेचा खून झाला असल्याची माहिती ८ महिन्यांनतर काही दिवसापूर्वी आम्हाला मिळून आली होती”, असे पोलिसांनी सांगितले.

दिपाली यादव

“माहितीच्या आधारावर लल्लन याच्या चौकशीत तिचा पूर्व पती निसार याने तिचा खून करून दोघांनी मिळून तिला खाडीत फेकून दिल्याची माहिती दिली,” असे याबाबत बोलताना पवई पोलिस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक विनोद लाड यांनी सांगितले.

“आम्ही मुंबई, ठाण्यातील सर्व पोलिस ठाण्यात बेवारस महिला मृतावस्थेत मिळून आल्याची माहिती मागवली होती. मालवणी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पवईतून हरवलेल्या महिलेच्या वर्णनाच्या महिलेचा शव मिळून आला होता या संदर्भात तिथे भादवि कलम ३०२, २०१ नुसार खुनाचा गुन्हा नोंद असल्याचे सुद्धा समोर आले”, असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुधाकर कांबळे यांनी सांगितले.

“१९ जुलै रोजी दिपालीला आपण मालाड येथे पबमध्ये जावूया असे सांगत आरोपी निसार याने बोलावून घेतले होते. यावेळी त्याने आपला मित्र आणि गरजेच्या वेळी गाडी पुरवठा करणारा लल्लन याला सुद्धा सोबत घेतले. गाडी मालाड परिसराच्या आसपास पोहचताच निसार याने रस्सीने दिपालीचा गळा आवळत तिला जिवे मारले. तिला मारल्यानंतर ते सरळ गाडी पुढे घेवून जात त्यांनी खाडीत तिचा शव फेकून दिला, असे यासंदर्भात बोलताना पोलिसांनी सांगितले.

“प्राथमिक तपासात सदर महिला दोघांच्यातील प्रेमाचे गुपित त्याच्या सध्याच्या पत्नीपासून लपवून ठेवण्यासाठी निसार याच्याकडे पैशाची मागणी करत असल्याने त्याने तिचा खून केला असल्याचा जवाब आरोपीने दिला आहे”, असे याबाबत बोलताना पोलिस उपायुक्त परिमंडळ १०, अंकित गोयल यांनी सांगितले.

खुनाची माहिती समोर येताच आरोपी निसार सिकुर शेख आणि धुवचंद्र उर्फ लल्लन तिवारी यांना पवई पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता, पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील चौकशीसाठी त्यांना मालवणी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

, , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!