पवईत वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या स्पावर पोलिसांचा छापा; एकाला अटक

पवईत मसाज आणि स्पाच्या नावाखाली कुंटणखाना चालवत महिलांना वेश्या व्यवसायाकरिता भाग पाडणाऱ्या स्पावर शुक्रवारी पवई पोलिसांनी छापा टाकत महिलांची सुटका केली आहे. सदर गुन्ह्यात पवई पोलिसांनी स्पाचा चालक, मालक याला अटक केली आहे. सद्दाम सादिक अन्सारी (वय २९ वर्ष) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी स्पा चालक, मालकाचे नाव आहे.

यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवईमध्ये मसाज आणि स्पाच्या नावाखाली एक व्यक्ती वेश्याव्यवसाय चालवत असल्याची खात्रीलायक माहिती पवई पोलिसांना प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारावर बनावट ग्राहक पाठवून पोलिसांनी खरंच स्पा सेंटरच्या नावाने वेश्या व्यवसाय सुरु आहे का? याची खातरजमा केली.

खात्री पटताच माहितीच्या आधारावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) गणेश पाटील यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक सुर्यकांत पारटकर आणि दहशतवाद विरोधी पथक पो.ह. जगधने, पो.ना. लांडगे, पो.शि. कासारे यांनी छापा टाकत जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करण्यास भाग पडलेल्या महिलांची सुटका केली.

“पवई प्लाझा येथील दुसऱ्या मजल्यावर असणाऱ्या ‘हायजेनिक स्पा द सलूनमध्ये विविध भागातून महिलांना आणून, महिलांना जबरदस्ती वेश्याव्यवसाय करण्यास भाग पडत असल्याची माहिती आम्हाला प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने ६ ऑक्टोबरला सदर ठिकाणी छापा टाकला तेव्हा तेथे जबरदस्ती आणलेल्या काही महिला आम्हास मिळून आल्या, त्यांची सुटका करण्यात आली आहे,” असे पवई पोलिसांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, “महिलांना जबरदस्ती वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडल्याबद्दल भादवि कलम ३७० (३) सह कलम ३,४,५ ‌अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा अंतर्गत कारवाई करत गुन्हा नोंद करून स्पाचा चालक, मालक याला अटक केली आहे.”

, , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!