सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी बसमधे, ट्रेनमध्ये चढणाऱ्या लोकांची पाकिटे, मोबाईल, किंमती सामान लांबवणाऱ्या टोळ्या संपूर्ण मुंबईभर धुडगूस घालत आहेत. पवई, साकीनाका भागात गेल्या महिनाभरात अशा प्रकारच्या ७ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. या गुन्ह्यांना आळा बसावा आणि मुंबईकरांच्यात जनजागृतीसाठी पवई पोलीस ठाण्याच्यावतीने पवईतील गर्दीच्या आणि प्रमुख बस थांब्यांवर “खिसेकापू, मोबाईल चोरांपासून सावधान” असा इशारा देणारे पोस्टर लावून जगजागृती मोहीम राबवली जात आहे.
मुंबई आणि मुंबईकर म्हणजे घड्याळाच्या काट्यावर चालणारे. शिक्षण पूर्ण होताच देशाच्या ग्रामीण भागातून अनेक तरुण शहरांकडे धाव घेतात, मुंबई सुद्धा त्यापैकी एक. वाढत्या लोकसंख्येमुळे मुंबईची वाहतूक व्यवस्था असणाऱ्या बेस्ट बसेस, लोकल ट्रेन यांच्यावर ऑफिसच्या वेळी सकाळी आणि संध्याकाळी मोठ्या प्रमाणात गर्दीचा मोठा दबाव असतो आणि या गर्दीचा फायदा घेत फावते ते चोरट्यांचे. गर्दीचा फायदा घेऊन धक्काबुक्कीत तुमच्या जवळ असणारे मोबाईल, पाकीट, किंमती सामान कधी गायब होते कळतच नाही. खिशात हात जातो तेव्हा कळते कि आपला खिसा कापला गेला आहे आणि आपले सामान गायब आहे. मुंबई शहराच्या अनेक पोलीस ठाण्यात दररोज असा एक तरी गुन्हा नोंद होत असतो.
या चोरीच्या गुन्ह्यांना घडण्यात कुठेतरी त्या त्या गर्दीत झालेल्या दुर्लक्षपणा किंवा निष्काळजीपणा कारणीभूत ठरत असतो. म्हणूनच लोकांना याची पदोपदी जाणीव होत रहावी यासाठी पवई पोलिसांनी शक्कल लढवत पवईतील गर्दीच्या आणि महत्वाच्या सर्व बस थांब्यावर “खिसेकापू, मोबाईल चोरांपासून सावधान” असे संदेश देणारे पोस्टर लावले आहेत.
‘अलर्ट असल्यास समोर होणारी कोणतीही गैर गोष्ट आपण सहज रोखू शकतो. धावपळीत कुठेतरी क्षणभरासाठी आपला अलर्टनेस सुटतो आणि चोर हीच संधी साधून आपला डाव साधतो. म्हणूनच आम्ही ठिकठिकाणी बसथांब्यांवर नागरिकांना अलर्ट करणारे पोस्टर लावून त्यांना आसपास घडणाऱ्या घडामोडींबाबत अलर्ट राहण्याचा संदेश दिला आहे.’ असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पोफळे यांनी सांगितले.
अजून एक वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबत बोलताना सांगितले कि, ‘नागरिक जर जागरूक असेल तर परिसरात घडणारे अनेक गुन्हे तो रोखू शकतो आणि यापूर्वी अनेक घटनांच्या वेळेस ते पाहायला मिळाले आहे. प्रत्येक नागरिकाने किमान आपल्या वस्तूची काळजी घेतली तरी खिसेकापू, चोरी सारखे अनेक गुन्हे रोखले जाऊ शकतात.’
या बॅनर्स आणि पोस्टरमुळे केवळ नागरिकच नव्हे तर चोर, खिसेकापू सुद्धा जागरूक झाले असून, गेल्या ८ दिवसात पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकही अशा प्रकारचा गुन्हा घडलेला नाही.
No comments yet.