अविनाश हजारे/रविराज शिंदे
मागील अनेक प्रकरणांवरून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असतानाच अफाट कामगिरीची चुणूक पवई पोलिसांनी दाखवून दिली आहे. पवईच्या तुंगागाव परिसरातून हरवलेल्या हर्षद सुमित यादव या 3 वर्षीय चिमुकल्याला चोवीस तासाच्या आत शोधून काढत त्याच्या आई-वडिलांच्या हवाले करून पोलिसांनी आपल्या कार्यतत्परतेची प्रचिती दिली आहे.
पवईच्या तुंगा परिसरात यादव दाम्पत्य राहतात. 5 मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता त्यांचा मुलगा हर्षद घराबाहेर खेळत असताना अचानक तेथून गायब झाला. आजूबाजूच्या परिसरात व नातेवाईकांकडे शोधाशोध केल्यानंतरही कुठेच सापडत नसल्याने रात्री 11 वाजता वडील सुमित यादव यांनी पवई पोलीस ठाणे गाठले.
पवई पोलिसांनीही तत्परता दाखवत भा.दं.वि. कलम ३६३ नुसार प्रकरण नोंदवून घेत वेगवान हालचाली सुरू केल्या .
पवई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पुष्कराज सूर्यवंशी, सपोनि संभाजी मोहिते, पोलीस उप- निरीक्षक समीर मुजावर, पोउनि सुरज राऊत आणि टीमने हरवलेल्या मुलाचा शोध घेण्यासाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लागली.
सी.सी.टी.व्ही.च्या आधारे त्याला उचलून नेणाऱ्या लोकांची माहिती मिळवत, लोकेशन ट्रॅक करत चोवीस तासांच्या आत मोठ्या शिताफीने तुर्भे स्टेशनवरून त्याला पळवून नेणारे आरोपी रवी ज्ञानसिंह, गीता रवी सिंह, मुस्कान सिंह यांना अटक करत हर्षदची सुटका केली.
“अटक केलेल्या सर्व आरोपींची कसून चौकशी करत असून त्यांनी अजूनही काही गुन्हे केले आहेत का याचा आम्ही तपास करत आहोत. उदया (बुधवारी) त्यांना कोर्टात हजर केले जाणार आहे” अशी माहिती याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याचे व.पो.नि. भाई महाडेश्वर यांनी दिली.
पवई पोलिसांनी खूपच कमी वेळात या प्रकरणाचा छडा लावत, आरोपींच्या मुसक्या आवळल्याने सर्वत्र त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, हरवलेल्या मुलाच्या आई-वडिलांनी व त्यांच्या नातेवाईकांनीसुद्धा त्यांचा मुलगा सुखरूप परत आणून दिल्याने पोलिसांचे आभार मानले आहेत.
आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा
No comments yet.