टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेस (टीस) मध्ये शिक्षण घेणाऱ्या रामबाग येथील संकेत तांबे प्राध्यापकांच्या अपमानास्पद बोलण्यानंतर निराशेत असताना सोमवारी आत्महत्या केल्यानंतर पवई पोलिसांनी प्राध्यापकाला समन्स पाठवले आहेत.
एलएलबीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पवईतील रामबाग येथे राहणारा संकेत तांबे टीसमध्ये शिक्षण घेत होता. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून त्याने तिथे जाणे बंद केले होते. याबाबत पालकांनी विचारणा केली असता त्याला एक प्राध्यापक हिणवून बोलून त्रास देत असल्याबाबत त्याने सांगितले होते. अनेक दिवस निराशेत फिरणाऱ्या संकेतने सोमवारी पहाटे ३ वाजता आपल्या राहत्या इमारत कॉस्मोपॉलिटिनच्या ८व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.
या घटनेचा पंचनामा करताना पवई पोलिसांना त्याच्या घरी इंग्लिशमध्ये लिहलेली त्याची सुसाईड नोट मिळून आली होती. ज्यात त्याने टीसमधील प्राध्यापक पी. विजयकुमार यांना तो नापसंत करत असल्याचा उल्लेख केला आहे. ज्याची दखल घेत संकेतच्या आत्महत्येप्रकरणी त्या प्राध्यापकाला पोलिसांनी समन्स पाठवला आहे.
संकेतने इंजिनिअरिंग आणि तीन वर्षाचा लॉ कोर्स पूर्ण केल्यानंतर जून महिन्यापासून तो टीसमध्ये ऑर्गनायनजेशनल डेव्हलपमेंट, चेंज अँड लिडरशीप करीत होता. परंतु, पहिल्या सत्रानंतर ऑक्टोबरपासून त्याने या क्लासला जाणे बंद केले होते.
प्राध्यापक ‘तू एक सुशिक्षित बेकार आहेस. तू येथे येऊ नकोस’ अशा शब्दात हिणवत होते, त्यामुळे तो निराश झाला होता आणि त्याने हे पाऊल उचलले असे संकेतच्या पालकांनी पवई पोलिसांना दिलेल्या जवाबात म्हटले आहे.
प्राध्यापकांनी दिलेल्या अपमानास्पद वागणुकीबाबत संकेतच्या पालकांनी टीसला लेखी तक्रार सुद्धा केली होती.
‘संकेतने आपल्या सुसाईड नोटमध्ये प्राध्यापकांचे नाव लिहिले असले तरी, तो त्यांना पसंत करत नव्हता असा उल्लेख त्याने त्यात केला आहे. त्यांच्यामुळे तो आत्महत्येस प्रवृत्त झाला असा स्पष्ट उल्लेख त्यात करण्यात आलेला नाही. त्यामुळे आम्ही चौकशी करून मगच योग्य ती कारवाई करू,’ असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
पवई पोलिसांनी भादवी कलम ३०६ नुसार गुन्हा नोंद करून प्राध्यापकांना समन्स पाठवला आहे.
No comments yet.