पवईतील साई बांगुर्डा येथे मित्राचा खून करून पसार झालेल्या मित्राला अखेर पवई पोलिसांनी आज अटक केली. जीवन रवी मोरे (४०) असे अटक आरोपीचे नाव असून, उद्या त्याला कोर्टात हजर केले जाणार आहे.
पवईमधील गौतमनगर येथे राहणारा दिनेश लक्ष्मण जोशी (३०) आपला मित्र जीवन मोरे सोबत गुरुवारी साई बांगुर्डा येथील स्काऊट गाईडच्या बंद असणाऱ्या इमारतीमध्ये पार्टी साजरे करण्यासाठी गेले होते. जेवण बनवायचे सुरु असताना दोघांच्यात आलेल्या खर्चाला घेवून भांडण झाले आणि त्याच रागात जीवनने दिनेश याला लाकडी काठी आणि लाथा-बुक्यांनी मारून गंभीर जखमी करून तेथून पोबारा केला होता.

गेल्या वर्षी पवई तलाव येथे रस्त्यावर आलेले अजगर पकडून सुरक्षित ठिकाणी सोडण्यासाठी घेवून जाताना पिडीत दिनेश जोशी याचे आवर्तन पवईने घेतलेले छायाचित्र.
दिनेशला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर पोलिसांनी भादवि कलम ३०२ अन्वये गुन्हा नोंद करून तपास सुरु केला होता.
‘आरोपीला परिसरातील कोणीच ओळखत नव्हते.त्यामुळे त्याला शोधणे आमच्यासाठी खूप मोठी परीक्षा होती. मात्र, एक भाजीविक्री करणाऱ्या स्त्रीने आरोपीला ओळखणाऱ्या इसमाची माहिती दिल्यानंतर आम्ही त्याच्या आधारे माहिती मिळवून लपून बसलेल्या आरोपी जीवन याला साई बांगुर्डा येथून आज अटक केली.’ असे याबाबत बोलताना गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सपोनि सचिन वाघ यांनी सांगितले.
तू खर्चातील हिशेबाचे १० रुपये कमी दिले आहेत, ते दिल्याशिवाय तुला जेवणातील एक घास सुद्धा मिळणार नाही असे दिनेश मला बोलला त्यामुळे त्याचा राग येवून मी सर्व विस्कटून टाकून त्याला लाकडी बांबू मारहाण करून दगडावर आपटले असे आपल्या गुन्ह्याची कबुली देताना जीवन याने पोलीस जवाबत सांगितले.
“गुन्ह्याच्या ठिकाणावरून आम्ही गुन्ह्यात वापरलेला लाकडी बांबू ताब्यात घेतला असून ठिकाणाचा पंचनामा सुद्धा केला आहे. उद्या त्याला कोर्टात हजर केले जाईल’ असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याच्या अजून एका अधिकाऱ्याने सांगितले.
गुन्हा उघड करण्यासाठी सपोनि सचिन वाघ सह पो. ह. राजाराम कुंभार, पो. ना. संतोष देसाई, पो. ना. अमित जगताप, पो. शि. अजय बांदकर, पो. शि. अविनाश जाधव, पो. शि. सचिन गलांडे यांनी विशेष मेहनत घेतली.
No comments yet.