पवई भागात वाढत्या नशाखोरीला रोखण्यासाठी भारतीय जनता पार्टी (भाजपा) वार्ड क्रमांक १२२ तर्फे सोमवारी हिरानंदानी ते आयआयटी ‘पवई से नो टू ड्रग्ज’ रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपा नगरसेवक (१२२) वैशाली पाटील, पदाधिकारी व कार्यकत्यांसह मोठ्या प्रमाणात स्थानिक यात सहभागी झाले होते.
अनेक तरुणांना ड्रग्ज सारख्या व्यसनाने आपल्या कवेत घेतलेले असताना, आता याची लाट शाळेत आणि लहान मुलांमध्ये सुद्धा पोहचू लागल्याने शाळा आणि पालक सर्वांनीच धास्ती घेतली आहे. याला रोखण्यासाठी पवईतील अनेक शाळांनी शाळेत जनजागृती मोहीम आणि परिसंवादांचे आयोजन केले आहे. याच्या आहारी गेलेल्या मुलांचे पालक समुपदेशक, डॉक्टर्सच्या फेऱ्या मारत आहेत. अनेक सामाजिक संस्थांनी सुद्धा जनजागृती मोहिमा राबवलेल्या आहेत. मात्र आकर्षण आणि मित्रांच्या संगतीने आणखी पिढी याच्या आहारी जावू नये म्हणून स्वतः स्थानिक नगरसेविका वैशाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा आता मैदानात उतरली आहे. याचाच भाग म्हणून सोमवारी नो ड्रग्ज रॅलीचे त्यांच्यावतीने आयोजन करण्यात आले होते.
हिरानंदानी येथील ब्लू बेल इमारतीपासून सुरु झालेल्या या रॅलीत ड्रग्जमुळे होणारे दुष्परिणामांची आकडेवारी सांगणारे फलक हातात घेवून अनेक स्थानिक रस्त्यावर उतरले होते.
“लोकप्रतिनिधी या नाते येथील प्रत्येक समस्या ही माझी समस्या असली पाहिजे. येथील लोकांशी चर्चा करताना मला या परिसरात ड्रग्ज सेवनाच्या वाढत्या समस्येच्या तक्रारी मिळत आहेत. म्हणूनच आम्ही जनजागृतीसाठी ‘पवई से नो टू ड्रग्ज’ रॅलीचे आयोजन केले आहे. एवढ्यावरच न थांबता आम्ही पोलीस आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला सुद्धा याबाबत कठोर पाऊले उचलण्याचे निर्देश देणार आहोत” असे यावेळी बोलताना स्थानिक नगरसेविका वैशाली पाटील यांनी सांगितले.
No comments yet.