२ खून करून उत्तरप्रदेश पोलिसांच्या हातावर तुरी देत १२ वर्ष पसार असणाऱ्या आरोपीला पवई पोलिसांनी गुन्ह्याच्या ३ महिन्यातच ठोकल्या बेड्या.
पवईतील तुंगागाव येथील लोढा सुप्रीम या रहिवाशी इमारतीच्या सुरक्षा रक्षकाचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार पाठीमागील वर्षी २७ ऑक्टोबरला पवईत घडला होता. इमारतीच्या पार्किंग परिसरात सुरक्षा रक्षक रक्ताच्या थारोळ्यात पोलिसांना मिळून आला होता. इमारतीत लिफ्ट ऑपरेटर असणाऱ्या अविनाश कुमार लक्ष्मीकांत पांडे (३७) याने हा खून केला असल्याची माहिती समोर आली होती. या संदर्भात पवई पोलिस भादंवि कलाम ३०२ नुसार गुन्हा नोंद करून, आरोपीचा शोध घेत होते.
“आरोपी अविनाश पांडे हा कमला मार्केट, नवी दिल्ली या ठिकाणी आला असलेबाबत खात्री लायक माहिती आम्हाला प्राप्त झाली होती. ज्याच्या आधारावर पवई पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक विनोद लाड, पोलीस नाईक मोहोळ व पोलीस शिपाई देशमुख असे पथक तात्काळ नवी दिल्ली येथे रवाना करण्यात आले होते” असे याबाबत बोलताना अंकित गोयल पोलीस उप आयुक्त परिमंडळ १० यांनी सांगितले.
“आरोपीला पवई पोलीस ठाण्याच्या पथकाने तेथील स्थानिक कमला मार्केट पोलीस ठाणे, नवी दिल्ली पोलिसांचे मदतीने रविवारी संध्याकाळी ३.३० वाजता तपासकामी ताब्यात घेतले” असे पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर कांबळे यांनी आवर्तन पवईशी बोलताना सांगितले.
काय आहे प्रकरण?
नालासोपारा येथे राहणार अंकित (रिषभ) देवीप्रसाद सिंग (२४) ऑक्टोबर २०१९मध्ये साकीविहार रोड येथील लोढा सुप्रीम पार्क येथे सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत झाला होता. २६ ऑक्टोबरला नेहमीप्रमाणे तो आपल्या कर्तव्यावर असताना रात्री २.२० वाजण्याच्या सुमारास इमारतीत असणाऱ्या इतर सहकाऱ्यांना तो पार्किंग परिसरात रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला होता.
पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत त्याला राजावाडी रुग्णालयात दाखल केले, मात्र दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले होते. “त्याच्या गळ्यावर धारदार हत्याराने वार करण्यात आले होते. सोबतच त्याच्या गुप्तांगावर सुद्धा काही घाव मिळून आले होते. त्यामुळे त्याच्या हत्येमागचे गूढ वाढले होते”, असे याबाबत बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.
“आम्ही भादंवि कलम ३०२ (खून) नुसार गुन्हा नोंद करून, सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरु केला होता. ‘त्याच्या सहकाऱ्यांच्या चौकशीतून इमारतीचा लिफ्ट ऑपरेटर अविनाश पांड्ये घटनेच्या दिवसापासून गायब असून, दोघांच्यातील वादातून हा खून झाला असल्याचे समोर आल्याने आम्ही त्याचा शोध घेत होतो, असे याबाबत बोलताना पोलीस सूत्रांनी सांगितले.
त्याच रात्री आरोपीने पुणे येथे पलायन केले होते. पुढे तो सातारा, गुजरात, ओडीसा, कर्नाटक, दिल्ली, बँगलोर अशा विविध ठिकाणी फिरत होता. तो आपल्या कोणत्याही मित्राच्या किंवा परिवाराच्या संपर्कात नव्हता, त्यामुळे त्याचा शोध काढणे पोलिसांसाठी एक आवाहनच होते.
घटनेनंतर तो दिल्लीच्या हद्दीत असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती, ज्याच्या आधारावर आम्ही तिथे सापळा रचला होता मात्र तो मिळून आला नाही. ज्यानंतर आम्ही त्याच्या यापूर्वी काम केलेल्या सर्व जागांची माहिती मिळवत त्या त्या ठिकाणी भेट देवून आमचे खबरी पेरले होते. “रविवारी तो दिल्लीत येणार असल्याची माहिती आमच्या खबऱ्याने देताच आम्ही तिथे रवाना होत स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत” असे याबाबत बोलताना गुन्हेप्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक विनोद लाड यांनी सांगितले.
आरोपीच्या चौकशीत त्याच्या आणि अंकितच्यामध्ये सतत छोट्या छोट्या कारणावरून वाद होत असत. दोघेही एकत्रित काम करत असल्याने एकत्रित पैसे लावून बसून लुडो खेळणे, दारू पिणे असे प्रकार घडत. “घटनेच्या दिवशी सुद्धा दोघांच्यात दारू पिऊन लुडोचा गेम खेळणे चालू होते. या गेमच्या दरम्यान पैशाच्या देवाणघेवाणीतून दोघांच्यात वाद झाला होता आणि यातूनच त्याने हा खून केल्याची कबुली दिली आहे”, असे याबाबत बोलताना गोयल यांनी सांगितले.
सदर आरोपीवर या पूर्वी खुलदाबाद पोलीस ठाणे, अलाहाबाद, उत्तर प्रदेश येथे गु.र.क्र. ८६/२००० भादवि कलम ३०२, ३४नुसार, तसेच वि.स्था.ख.क्र. १०१/०२ कलम ३ सह २५ भा.ह.का. नुसार गुन्हे नोंद आहेत. तसेच पांडे याच्या विरोधात चुलत भावाच्या मर्डर प्रकरणी होलागढ पोलीस ठाणे, अलाहाबाद, उत्तर प्रदेश या ठिकाणी गु.र.क्र. १३५/०८ भा.द.वि. कलम ३९४, ३०२ अनव्ये गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यात आरोपी अद्याप वॉन्टेड होता व त्याच्यावर उत्तर प्रदेश सरकार तर्फे रोख १०,०००/- रुपये बक्षीस जारी करण्यात आले आहे.
आरोपीला न्यायालयात हजर केले असता २१ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
No comments yet.