@रविराज शिंदे
ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरात एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर शालेय कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याचे पडसाद मुंबईसह महाराष्ट्रभर उमटत असून, संतापाची लाट सर्वत्र पसरली आहे. पवईत देखील महिलांमध्ये याचा आक्रोश पहायला मिळत आहे.
आज, बुधवार २१ ऑगस्टला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पवईतील प्रभाग क्र. १२२च्या समस्त महिला आघाडीसह शिवसैनिक आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले. तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून काळे झेंडे तसेच बदलापूरमध्ये झालेल्या क्रूर अमानुष अत्याचार घटनेचा जाहीर निषेध दर्शवणारे फलक दाखवत शिवसैनिक, कार्यकर्ते यांनी रस्त्यावर उतरत मूक मोर्चा काढला.
पवईतील चैतन्यनगर येथून मूकमोर्चाची सुरुवात होत ज्ञान मंदिर, केंद्रीय विद्यालय रोड, पवई इंग्लिश हायस्कूल रोड, आयआयटी मेनगेट मार्गे विविध शालेय परिसरातून आयआयटी भाजी मार्केट येथे या मोर्चाचा समारोप करण्यात आला.
डॉक्टर महिला असो, शाळकरी विद्यार्थिनी असो किवा इतर कोणत्याही क्षेत्रात काम करणारी महिला असो सुरक्षित राहिलेली दिसत नाही. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी असणाऱ्या लोकांनी त्वरित याची दखल घेत योग्य त्या उपाय योजना कराव्यात अशी मागणी शिवसैनिकांनी यावेळी केली.
“आमच्या महिला भगिनीचे हे म्हणणे आहे की, मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजना चालू केली आहे ती नाही दिलीत तरी चालेल, त्याच्या ऐवजी त्यांनी आम्हाला सुरक्षेची खात्री द्यावी” अशी मागणी यावेळी बोलताना शिवसेना शाखा क्र. १२२ उपविभाग संघटिका सुषमाताई आंब्रे यांनी केली.
No comments yet.