बेकायदा घरे विकून लोकांना करोडोचा गंडा घालणाऱ्या तीन झोपडपट्टी माफियांना पवई पोलिसांनी केली अटक
वन विभागाच्या जागेवर घरे बांधून, ती आपले असल्याचे भासवून, लोकांना विकून करोडोचा गंडा घालणाऱ्या एका महिलेसह तिच्या दोन साथिदारांना पवई पोलिसांनी वन विभाग अधिकाऱ्यांच्या मदतीने अटक केली आहे. रेश्मा खान (४५), नैबुल हुसेन (४४) व मोहमद हुसेन खान (३७) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
फिल्टरपाड्यात राहणाऱ्या झोपडपट्टी माफिया रेश्मा खान हिने नैबुल व मोहमद हुसेनच्या मदतीने फिल्टरपाडा बेस्टनगर येथे वनखात्याच्या जमिनीवर अतिक्रमण करत तेथे अनेक बेकायदेशीर घरे उभी केली. ज्यातील अनेक घरे तिने आपल्या दोन साथिदारांच्या मदतीने लोकांना विकली आहेत.
काही महिन्यापूर्वीच आणखी नऊ लोकांना तिने घरे चार ते सहा लाखात विकली. मात्र, त्याचा ताबा मिळवण्यापूर्वीच ३० व ३१ मे रोजी बेस्टनगर भागात वनखात्याच्या जागेवर असणाऱ्या ९० पेक्षा जास्त झोपड्यांवर वनविभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली. या संदर्भात घरे विकत घेणाऱ्या लोकांनी रेश्माकडे याचा जाब विचारण्यासाठी तिचे घर गाठले असता, ती व तिचे साथीदार तेथून गायब असल्याचे समोर आले. वारंवार खेटे घालून सुद्धा जेव्हा ती मिळून आली नाही, तेव्हा लोकांना तिने फसवल्याचे लक्षात आल्यावर १८ जूनला त्यांनी पवई पोलिसात तक्रार दाखल केली.
“आठवड्याभराच्या शोधानंतर अखेर आम्ही तिघांना अटक करून न्यायालयात हजार केले असता त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे” असे आवर्तन पवईशी बोलताना वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
ते पुढे म्हणाले, “मुख्य आरोपी रेश्माच्या परिवारातील अनेक लोकांवर जबरी चोरी, दरोडा, हत्या असे गुन्हे नोंद असून, ते सध्या न्यायालयीन कोठडीत शिक्षा भोगत आहेत. ज्याचा फायदा घेत तिने परिसरात दहशत पसरवली होती. त्यामुळे तिच्या विरोधात तक्रार करण्यास कोणीच पुढे येत नसे.”
रेश्माला नोटरी आणि घर तिच्या मालकीचे दाखवण्यासाठी बनवण्यात आलेली कागदपत्रे मिळवून देण्यात कोणी मदत केली आहे याचा आता पोलीस शोध घेत आहेत.
आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा
No comments yet.