महिलांना गोड बोलून लुटणाऱ्या इसमाचा पवईत धुमाकूळ

पवई पोलिसांचा महिलांना सतर्कतेचा इशारा, मुंबई पोलीस हेल्पलाईनवर त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन

stalker-shadowचांदिवली, हिरानंदानी येथील महिलांशी प्रेमळ, गोड बोलून लुटणाऱ्या, फसवणूक करणाऱ्या इसमाने गेल्या अनेक दिवसांपासून पवईत धुमाकूळ घातल्याने महिलांमध्ये एकच खळबळ माजली आहे. एकट्या महिलेला गाठून तिच्याशी प्रेमळ, गोड बोलून, कोरिओग्राफर असल्याचे सांगून हा इसम त्यांच्याकडून पैसे व वैयक्तिक माहिती मिळवीत आहे. पैसे नाकारल्यास त्याच्याकडून महिलांच्या हातातील पर्स पळवून नेण्याचे प्रकार सुद्धा घडत आहेत. जवळपास ८ स्थानिक आणि कामासाठी परिसरात येणाऱ्या महिला त्याच्या शिकार झाल्या असल्याचे समोर येत आहे. पवई पोलिसांनी याबाबत सतर्कता बाळगून असा व्यक्ती आढळताच मुंबई पोलिसांच्या हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

उत्तम इंग्रजी येत असणारा, सावळा, तिशीच्या वयातला हा इसम रात्री ८.३० ते ९.३० दरम्यान एस. एम. शेट्टी स्कूल, शिव भगतानी कॉम्प्लेक्स, गलेरिया हिरानंदानी येथे एकट्या असणाऱ्या महिलांना आपले सावज बनवत आहे. महिलांचे पर्स चोरणे, प्रेमळ बोलून फसवणूक करणे, वैयक्तिक माहिती मिळवणे आणि महिलांशी अश्लील संभाषण करण्याचे प्रकार हा व्यक्ती करत आहे.

फेसबुकच्या माध्यमातून अनेक महिलांनी पवईमध्ये त्यांच्या सोबत घडलेल्या अशा व्यथा मांडलेल्या आहेत. त्यांच्यानुसार रिक्षामधून हा व्यक्ती प्रवास करतो. एकट्या महिलेला पाहून आपली ओळख तो कोरिओग्राफर असल्याची करून देत माधुरी आणि शामक दावर सोबत त्याचा कार्यक्रम असल्याचे सांगतो. विमानतळावर त्याचे सामान हरवले आहे, पैशाची गरज असून ३०० रुपये द्या! अशी तो मागणी करतो. महिलांनी पैसे न दिल्यास त्यांच्या हातातील पर्स खेचून पळून जातो. पैसे नाहीत अशा महिलांना तो पत्ता किंवा पिन नंबरसह एटीएम कार्डाची मागणी सुद्धा करत आहे.

याबाबत आवर्तन पवईशी बोलताना नुकत्याच पवई पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक (गुन्हे) म्हणून पदभार स्वीकारलेल्या महिला पोलीस अधिकारी अनघा सातवसे यांनी सांगितले, “आम्ही आमच्या महिला पोलीस गस्त वाहनास त्या वेळेत संबंधित परिसरात गस्त वाढवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. महिलांनी कोणत्याही प्रकारची भिती न बाळगता असा व्यक्ती दिसताच, किंवा असे काही घडत असल्यास त्वरित मुंबई पोलिसांच्या १०० नंबरवर किंवा पवई पोलिसांच्या २५७०२६९० क्रमांकावर संपर्क साधून माहिती देवून त्यास पकडण्यास मदत करावी.”

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

 

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!