मेट्रो ४ आणि ६ मार्गिकेसाठी तोडल्या जाणाऱ्या आणि पुनर्रोपित करण्यात येणाऱ्या वृक्षांसाठी सुमारे दहा हजार नागरिकांनी इमेलद्वारे एकत्रितपणे आक्षेप नोंदवले.
स्वामी समर्थनगर ते विक्रोळी (मेट्रो ६) आणि कासारवडवली ते वडाळा (मेट्रो ४) या दोन मेट्रो मार्गिकांमधील १८२१ झाडे हटवण्याकरिता ‘मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सादर केलेल्या प्रस्तावांमध्ये त्रुटी व विसंगती आढळून आल्याने ते प्राधिकरणाला परत पाठवण्याचा निर्णय मुंबई महापालिकेच्या वृक्ष अधिक्षकांनी घेतला आहे.
मंगळवारी जनसुनावणी वेळी हा निर्णय घेण्यात आला. मेट्रो ४ आणि ६ साठी तोडल्या जाणाऱ्या आणि पुनर्रोपित करण्यात येणाऱ्या वृक्षांसाठी सुमारे दहा हजार नागरिकांनी इमेलद्वारे एकत्रितपणे आक्षेप नोंदवला होता.
मेट्रो मार्गामुळे १,८१२ झाडांवर परिणाम होणार आहे. त्यातील ६७३ कापण्यात येणार असून, उर्वरित १,१३९ वृक्षांचे प्रत्यारोपणाची एमएमआरडीएची योजना आहे.
मेट्रो ४, ६ आणि ३ मार्गिकेसाठी हटवाव्या लागणाऱ्या झाडांसाठीच्या प्रस्तावावर पालिका उद्यान अधिक्षकांनी मंगळवारी भायखळा येथे जनसुनावणी घेतली. प्रकल्प अहवाल (डीपीआर) आणि प्रस्तावातील झाडांच्या आकडेवारीतील विसंगती, मार्गात अडथळा नसलेली झाडे तोडणे असे आक्षेप उपस्थित करण्यात आले. पवई, लोखंडवाला, आदर्शनगर, चांदिवली, कांजूरमार्ग, भांडूप येथील नागरिक आणि विविध स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते अशा १०० पेक्षा जास्त हजर नागरिकांकडून यासाठी आक्षेप नोंदवण्यात आले.
यावेळी झालेल्या चर्चेनंतर प्राधिकरणाचे वृक्षतोडीचे व पुनर्रोपणाचे सर्व प्रस्ताव परत पाठवून सुधारित स्वरूपात मागविण्यात येतील, असे उद्यान अधिक्षक जितेंद्र परदेशी यांनी यावेळी बोलताना सांगितले.
मेट्रोची मार्गिका रस्त्याच्या मधून जाणार असताना रस्त्याच्या बाजूची झाडे तोडण्यास येथील नागरिकांनी ठाम विरोध केला. प्रस्तावित वृक्षतोड आणि पुनर्रोपण याबाबत एमएमआरडीए, वृक्ष प्राधिकरणाचे अधिकारी आणि स्थानिक नागरिक यांनी या ठिकाणांचे एकत्रित सर्वेक्षण करण्याची मागणी सुद्धा यावेळी नागरिकांनी केली.
हिरानंदानी, पवई येथील रहिवाशी सोनाली मिश्रा यांनी सुचवले की, पुनर्रोपण करण्यात आलेल्या झाडांना जिओ-टॅग केली जावीत आणि सर्वांच्या माहितीसाठी वेबसाइटवर त्यांच्या अस्तित्वाची माहिती दिली जावी. त्यातील किती जिवंत राहतील हे सांगणे आता कोणालाच शक्य नाही.
उपस्थित नागरिकांनी एमएमआरडीएच्या कारभारावर आक्षेप नोंदवत मेट्रो ६च्या प्रकल्पासाठी नागरिकांसोबत घेतलेल्या बैठकीचा अहवाल अजूनही न मिळाल्याचेही यावेळी नमूद केले.
विरोधाला तोंड देत पालिकेचे उद्यान अधिक्षक जितेंद्र परदेशी यांनी बैठकीत उपस्थित झालेल्या सर्व आक्षेपांची दखल घेत हा प्रस्ताव पुन्हा एमएमआरडीएकडे पाठविण्यास मान्य केले. रहिवाशांचा हा विजय ठरला असला तरी मेट्रो ६ मार्गिका भूमिगत व्हावी अशी नागरिकांची मूळ मागणी आहे. ती मागणी मान्य झाल्यास अशा अनेक समस्यांचे आपोआप निवारण होईल, असेही यावेळी बोलताना नागरिकांनी सांगितले.
No comments yet.